मुंबईकरांनी, बाळासाहेबांनी पाहिलेलं मुंबईचं स्वप्न आता पूर्ण करायचंय; फडणवीसांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 04:56 PM2022-08-20T16:56:27+5:302022-08-20T16:59:02+5:30

बाळासाहेबांच्या नावावर निवडून आलेल्यांनी ते स्वप्न धुळीस मिळवलं, ते स्वप्न पूर्ण करू शकले नाही; फडणवीस यांचं वक्तव्य.

bjp leader dcm devendra fadnavis said we have to complete balasaheb thackeray mumbaikars dream about mumbai bmc election targets shiv sena | मुंबईकरांनी, बाळासाहेबांनी पाहिलेलं मुंबईचं स्वप्न आता पूर्ण करायचंय; फडणवीसांचा निर्धार

मुंबईकरांनी, बाळासाहेबांनी पाहिलेलं मुंबईचं स्वप्न आता पूर्ण करायचंय; फडणवीसांचा निर्धार

Next

“जे स्वप्न मुंबईकरांच्या मनातील मुंबईकरीता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करायचे ही जबाबदारी आपली आहे. कारण त्यांचं नाव सांगून जे निवडून आले त्यांनी त्यांचं स्वप्न धुळीस मिळवले. ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत, ते इतके आत्ममग्न होते, इतके आत्मकेंद्रीत होते की, स्वतःच्या पलीकडे ते पाहू शकले नाहीत. या मुंबईकराकडे त्यांनी कधीही बघितले नाही. आता मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना आपण निवडून आणायचे आहे आणि मुंबईकरांनी जे स्वप्न पाहिले आहे, जे स्वप्न वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी पाहिले आहे, ते पूर्ण करण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे त्यासाठी कामाला लागा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात शनिवारी मुंबई भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी फडणवीसांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

“मागच्यावेळीच भाजपचा महापौर झाला असता. पण शिवसेनेसाठी आम्ही दोन पावलं मागे आलो,” असा गौप्यस्फोटही देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर निवडून आले त्यांनी मुंबईला वाऱ्यावर सोडलं. आपल्याला बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं

शेलारांना ट्वेंटी-ट्वेंटी खेळायचे माहित आहे
तुम्ही क्रिकेट खेळणारे आहात आणि जाणाणारे आहात. त्यामुळे तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी कशी खेळायची आणि जिंकायची तुम्हाला माहीत आहे. हा सामना तुम्ही जिंकणारच असेही फडणवीस आशिष शेलारांना म्हणाले. एमसीएमध्ये शेलारांनी मुंबई प्रीमीयर लिग सुरू केली आहे. आता पालिकेत मुंबई महापालिका विकास लीग तयार करायची आहे. मध्ये एखादा फुटबॉल आला, अडथळा आला तर त्याला किक कशी मारायची हे तुम्हाला माहीत आहेत. तुम्ही दोरी उड्या असोसिएशनचे अध्यक्ष आहात. त्यामुळे कुणी कितीही उड्या मारल्या तरी त्याला किती उड्या मारू द्यायच्या हे तुम्हाला माहीत आहे. मागचा आपला स्ट्राईक रेट मोठा होता. आपण ३५ वरून ८२ जागांवर आलो. आता आपला स्ट्राईक रेट मागचा रेकॉर्ड मोडणारा असला पाहिजे याकडे आमची नजर आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

डायलॉग तरी चेंज करा
निवडणूक जवळ आल्यावर भावनिक मुद्दे सुरू होतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र… असा आरोप होईल. त्यांना माहीत आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडलं जाणार नाही. कारण संविधान आहे. पण मुद्दाम भ्रम तयार केला जात आहे. त्यांनी किमान डायलॉग तरी चेंज करावा, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.

मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही
मुंबई मुंबई आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. दिल्ली दिल्ली आहे. देशाची राजधानी आहे. मुख्यमंत्री दिल्लीत गेले तर दिल्लीश्वरांसमोर झुकले. अरे एवढे दिवस काँग्रेसचे मुख्यमंत्री, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. तेही दिल्लीत जायचे. जावंच लागतं दिल्लीत. ती राजकीय राजधानी आहे. दिल्ली राजकीय राजधानी असेल तर दिल्लीत जावंच लागेल. त्याशिवाय प्रकल्प कसे पूर्ण होतील? तुम्ही दिल्लीत गेला. पण सोनिया गांधींसमोर नतमस्तक होण्यासाठी गेला. काही झालं तरी चालेल पण मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही. पण मुंबईकरांच्या हितासाठी मुख्यमंत्री आणि मला जितकी वेळा जावं लागेल तितके वेळा जाऊ आणि मान्यता आणू असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Web Title: bjp leader dcm devendra fadnavis said we have to complete balasaheb thackeray mumbaikars dream about mumbai bmc election targets shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.