दिवाळीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी फोडला बॉम्ब; नवाब मलिकांनीही हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे दिले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 07:45 AM2021-11-10T07:45:49+5:302021-11-10T07:46:07+5:30
माहिमच्या अल हुसैनी इमारतीत टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स त्यानेच भरले.
मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून भाजप व राष्ट्रवादी यांच्यात आरोपांचे बॉम्ब फुटत आहेत. नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांनी बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांकडून कोट्यवधी रुपयांची जमीन विकत घेतल्याचा बॉम्बगोळा देवेंद्र फडणवीस यांनी फोडला. तर, फडणवीस यांच्या अंडरवर्ल्ड संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब आपण बुधवारी फोडू, असे प्रतिआव्हान मलिक यांनी दिले.
१९९३ च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांसह दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्यांकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक व कुटुंबीयांनी कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. मुंबईत बॉम्बस्फोट घडविणारे, मुंबईच्या मारेकऱ्यांशी मलिक यांचे आर्थिक संबंध कसे, असा सवाल फडणवीस यांनी केला. सरदार शहा वली खान आणि मोहम्मद सलीम इशाक पटेल ऊर्फ सलीम पटेल या दोघांशी केलेले आर्थिक व्यवहार आणि त्यांच्याकडून कोट्यवधीची जमीन कवडीमोल भावात कशी खरेदी केली, याचे पुरावेही त्यांनी सादर केले.
फडणवीस म्हणाले, सरदार शहा वली खान हा मुंबई बॉम्बस्फोटाचा गुन्हेगार असून त्याला जन्मठेप झाली आहे. तो कारागृहात आहे. टायगर मेमनच्या नेतृत्वात फायरआर्म ट्रेनिंगमध्ये तो सहभागी झाला होता. मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीत बॉम्ब कुठे ठेवायचा, याचा सर्व्हे त्याने केला होता. टायगर मेमनच्या घरी बॉम्बस्फोटाचे कारस्थान शिजले. त्या सर्व बैठकांना तो हजर होता.
माहिमच्या अल हुसैनी इमारतीत टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स त्यानेच भरले. माफीचे साक्षीदार आणि इतर गुन्हेगारांनी याबाबत प्रत्यक्षदर्शी पुरावा दिला, त्यामुळे त्याला जन्मठेप झाली. दुसरी व्यक्ती ही मोहम्मद सलीम इशाक पटेल ऊर्फ सलीम पटेल हा आहे. तो हसीना पारकरचा (दाऊदची बहीण) सहकारी, चालक आणि फ्रंटमॅन. तिच्यासोबत त्याला २००७ मध्ये पकडले होते. त्याला समोर करून संपत्ती बळकाविण्याचे काम ती करायची. या दोघांकडून मलिक यांच्या कंपनीने जागा खरेदी केली आहे.
फडणवीसांच्या काळातील अंडरवर्ल्ड संबंध उघड करू
मुंबई : देवेंद्र फडणवीस हे राईचा पर्वत करीत आहेत. बिनबुडाचे आरोप करीत त्यांनी नवा खेळ सुरू केला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी दहा वाजता फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाचे त्यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन मी उघड करेन, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी दिला.
दिवाळीनंतर फटाके फोडू, असे फडणवीस यांनी म्हटले होते. पण, मला वाटते की, फटाके भिजले आणि वाया गेले. फडणवीसांचा खबऱ्या कच्चा खेळाडू आहे. त्यांनी विचारले असते तर मीच त्यांना या व्यवहारांची कागदपत्रे दिली असती. फडणवीस यांनी अंडरवर्ल्डचा खेळ सुरू केला आहे. पण, मुख्यमंत्री असताना त्यांनी संपूर्ण मुंबईला कसे ओलीस ठेवले होते, याचा खुलासा करणार आहे. कोणता आंतरराष्ट्रीय डाॅन कुणासाठी मुंबईत आला, कसे व्यवहार झाले, हे उघड करणार असल्याचे मलिक म्हणाले.
ज्या जागेबाबत फडणवीस आरोप करत आहेत तेथे पूर्वीपासून आमचे गोदाम होते. भाडेकरू होतो. आमच्या साॅलिडस कंपनीकडे ती जागा आहे. समोर १४० सदनिकांची सोसायटी आहे. युतीचे पहिले सरकार असताना पोटनिवडणूक झाली तेव्हा माझे कार्यालय याच गोदामात होते. मुनिरा पटेल यांनी आमच्याशी संपर्क करुन आमच्याकडे असलेल्या जागेचा पूर्ण ताबा घ्या, असे म्हटले. सलीम पटेल याला पाॅवर ऑफ ॲटर्नी दिली होती. त्यामुळे त्याला रक्कम देऊन मालकी घेतली. तर, बाॅम्बस्फोटातील आरोपी सरदार वली खानचे घर तेथे होते. त्याचे वडील गोवावाला कम्पाऊंडमध्ये वॉचमनचे काम करत. त्याने तेथील ३०० मीटर जागेवर स्वतःचे नाव चढविले होते. त्यामुळे त्यांना पैसे देऊन ते सरेंडर करायला लावले, असा खुलासा मलिक यांनी केला.
ही सलीम-जावेदची स्टोरी नाही, ना कोणत्या इंटरव्हलनंतरचा सिनेमा आहे. हा अत्यंत गंभीर आणि राष्ट्राच्या सुरक्षेशी निगडित मुद्दा आहे. मी नवाब मलिक यांच्या जमीन व्यवहारांचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपालांकडे देईन. आपल्या पक्षातील नेत्याने काय गुण उधळले, हे पवार यांना कळले पाहिजे. राज्य व केंद्राच्या योग्य तपास यंत्रणेकडेही पुरावे देईल.
- देवेंद्र फडणवीस
फडणवीस यांनी या गोष्टी वाढवून सांगण्याचा प्रयत्न केला. आजवर माझ्यावर काेणीही अंडरवर्ल्ड कनेक्शनचा आरोप करू शकले नाही. कोणत्या यंत्रणेसमोर जायचे तेथे जा. माझ्या जावयाकडे गांजा सापडल्याचे फडणवीस म्हणाले होते. याप्रकरणी माझी मुलगी तुम्हाला नोटीस पाठवणार आहे. या लढाईत तुम्ही माफी मागेपर्यंत लढाई सुरूच ठेवू.
- नवाब मलिक