बाळासाहेबांची आठवण अन् उद्धवना टोला; न बोलता फडणवीसांनी दिली 'त्या' प्राण्याची उपमा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 08:45 PM2022-05-15T20:45:52+5:302022-05-15T21:21:34+5:30
उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचं शरसंधान; बाबरी, औरंगाबाद, हिंदुत्वावरून जोरदार टीका
मुंबई: वाघांचे फोटो काढून कोणाला वाघ होता येत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. उद्धवजी, तुम्ही कधी संघर्ष केलात? कोणत्या आंदोलनात सहभागी झालात? कधी रस्त्यावर उतरलात?, अशी प्रश्नांची सरबत्ती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मी अयोध्येला गेलो. बाबरीचा ढाचा पाडला. मी अभिमानानं हे सांगतो. त्याबद्दल तुम्हाला मिरची लागण्याचं कारण काय, असा सवाल फडणवीसांनी विचारला. ते गोरेगावातील हिंदी भाषिक मेळाव्यात बोलत होते.
मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही. संघर्ष करत इथेपर्यंत पोहोचलो आहे. बाबरी मशीद पाडायला आम्ही कारसेवक गेलो होतो. मला बदायूच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तिथं मी शिवसैनिकांची वाट पाहत होतो. पण कोणीच आलं नाही, अशा शब्दांत फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी केली.
आमचं हिंदुत्व गदाधारी आहे म्हणता. गध्यांना आम्ही अडीच वर्षांपासून लाथ मारून सोडलं सांगता. अहो उद्धवजी, लाथ कोण मारतो, असा प्रश्न फडणवीसांवी विचारला. बाळासाहेब भोळे होते. मी भोळा नाही, धूर्त आहे, फसणार नाही, असं काही दिवसांपूर्वी उद्धवजी म्हणाले. वाघ हा भोळाच असतो. धूर्त कोण असतो हे सगळ्यांना माहीत आहे. मलाही माहीत आहे. पण मी त्या प्राण्याचं नाव घेणार नाही, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना चिमटा काढला.