Manoj Jarange Patil ( Marathi News ) : "मनोज जरांगेंना ज्या प्रकरणात अजामीनपत्र अटक वॉरंट काढण्यात आलं आहे ते प्रकरण २०१३ सालीचं आहे. यापूर्वीही जरांगे यांना या प्रकरणात अजामीनपत्र वॉरंट निघाले होते, हे वॉरंट त्यांनी कोर्टात जाऊन रद्द केले. कोणत्याही क्रिमिनल केसमध्ये तुम्ही तारखेला हजर राहिला नाहीत, तर अशा प्रकारचे अजामीनपत्र वॉरंट निघत असते. मात्र तुम्ही कोर्टात तारखेला हजर राहिल्यानंतर असे वॉरंट रद्द होत असते. आमच्याही विरोधात काही आंदोलनांच्या प्रकरणात असे वॉरंट निघालेले आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांना निघालेल्या अटक वॉरंटशी आमचा संबंध नाही," असा खुलासा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेवर पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेबाबत मी त्यांना दोष देणार नाही. कारण मागच्याही उपोषणाच्या शेवटी तर ते माझ्या आईवरही बोलले होते. नंतर त्यांनी माफी मागितली आणि सांगितलं होतं की उपोषणामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झाला आणि संतापून मी असं बोललं. आता आपण असं समजू की आताही उपोषणामुळे झालेल्या संतापातून ते असं बोलले आहेत."
दरम्यान, "मलाच नेहमी टार्गेट का केलं जातं? माझी जी शक्ती आहे, लोकांचं प्रेम आहे, त्याचा धोका कोणाला आहे? कोणाला माझी भीती वाटते? हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तसंच इकोसिस्टम कोण चालवतं याचीही आपल्याला कल्पना आहे," असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.
मनोज जरांगेंनी नेमका काय आरोप केला?
देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये टाकून आतमध्ये मारायचे ठरवले असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. "मी शंभूराजांसारखं मरायला भीत नाही. फडणवीस यांना बांध फोडायची सवय लागली आहे. फडणवीसांनी मुंडे, महाजन घराणे संपवले. मुंडेंच्या बोटाला धरून हे मोठे झाले, मात्र यांनी कित्येक घराण्यांचे वाटोळं केलं," असा घणाघात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, "सलाईनवर पडून राहण्यात उपयोग नाही, त्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं, या मतावर मी आलो आहे. येथे पडून राहण्यापेक्षा मी मतदारसंघाची तयारी करेल. मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या आमदारांचा बंदोबस्त करायचा आहे," अशी भूमिका घेत जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी दुपारी १:३० वाजता उपोषण सोडलं आहे.