मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांवर सातत्यानं हल्ले सुरू आहेत. त्यावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. पश्चिम बंगालमध्ये आमचे कार्यकर्ते मारले गेले. मात्र तरीही आम्ही शांत बसलो नाही. हा तर महाराष्ट्र आहे. आम्ही गप्प बसू असं वाटेल, तर तो तुमचा गैरसमज आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी सरकारवर हल्ला चढवला.
देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत असताना अचानक थोडा वेळ ते थांबले. फडणवीसांच्या आसपास बसलेले भाजपचे नेते उभे राहिले. फडणवीस यांनी त्यांचं बोलणं काही क्षणांसाठी थांबवलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजप कार्यालयात आल्यानं ही सगळी हालचाल पाहायला मिळाली. राणे केंद्रात मंत्री असल्यानं आदराची भावना म्हणून भाजपचे नेते त्यांच्यासाठी उभे राहिले. राणे यांनी सगळ्यांना पाहून नमस्कार केला आणि ते फडणवीस यांच्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसले.
फडणवीसांचा हल्लाबोल; ठाकरे सरकार निशाण्यावरमशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दावरून मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला ३ मेपर्यंची मुदत दिली आहे. त्यामुळे वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजप नेते अनुपस्थित होते. त्याबद्दल फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं. गेल्या ४-५ दिवसांत घडलेल्या घटना, भाजप नेत्यांवरील हल्ले पाहता सरकारनं संवादासाठी जागा ठेवली आहे, असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आम्ही बैठकीला गेलो नाही, असं फडणवीस म्हणाले.
हिटलरी प्रवृत्तीनं वागायचं असंच जर राज्य सरकारनं ठरवलं असेल तर संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, असं आम्हाला वाटतं, अशा शब्दांत फडणवीसांनी भाजपची पुढील भूमिका सांगितली. गृहमंत्र्यांनी महत्त्वाच्या विषयावर बैठक बोलावली. पण त्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच उपस्थित नव्हते. मग ती बैठक केवळ टाईमपाससाठी होती का?, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.
विरोधकांना जिवानिशी संपवायचं, हीच प्रवृत्ती असेल तर आम्ही संघर्ष करू. किरीट सोमय्यांना केंद्राची झेड दर्जाची सुरक्षा आहे. पण पोलिसांसमोर त्यांच्यावर हल्ला झाला. मोहित कंबोज यांचं मॉब लिन्चिंग करण्याचा प्रयत्न झाला. एफआयआर नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागला. पोलखोल सभा, रथांवर हल्ले झाले. मात्र कितीही हल्ले झाले तरीही आम्ही गप्प बसणार नाही. भ्रष्टाचाराविरोधातील आमची लढाई सुरूच राहील, असं म्हणत फडणवीसांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.