मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षाने जय्यत तयारीला सुरूवात केली आहे. ठाण्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर सभा होणार आहे. अलीकडेच गुढी पाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंनी शिवसेना-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर १० दिवसांत पुन्हा एकदा मनसेची जाहीर सभा होत आहे. त्यातच आता भाजपानेही मुंबई महापालिकेच्या रणांगणात रणशिंग फुंकणार आहे. येत्या १ मे म्हणजे महाराष्ट्र दिनी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.
मुंबई महापालिकेवर गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. मागील २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या. तेव्हा अवघ्या काही जागांच्या फरकाने शिवसेनेने मुंबई महापालिकेवर पुन्हा सत्ता मिळवली. गेल्या निवडणुकीत भाजपाने थेट ३० हून ८० जागांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे यंदा मुंबई महापालिका ताब्यात घ्यायचीच असा चंग भाजपा नेत्यांनी बांधला आहे. त्यासाठी मुंबई भाजपाची कोअर कमिटी बनवण्यात आली आहे.
१ मे रोजी भाजपा मुंबईत मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहे. यावेळी मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकेच नाही तर मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजपा आक्रमकपणे लावून धरणार असल्याचं समजतं. त्यामुळे १७ एप्रिलपासून मुंबईत भाजपा पोलखोल अभियानाची सुरुवात करणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून महापालिकेत झालेला भ्रष्टाचार आणि शिवसेना नेत्यांवर होणारी कारवाई याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे १ मे रोजी होणाऱ्या सभेत भाजपा शिवसेनेविरोधात एल्गार पुकारणार असल्याचं बोललं जात आहे.
भाजपा-मनसे युती होणार?
गुढी पाडवा मेळाव्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट शिवसेना-राष्ट्रवादीला टार्गेट केले आहे. त्याचसोबत शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत जनतेची गद्दारी केली असा आरोप राज ठाकरेंनी केला. राज्यात भाजपा विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळते. त्यात राज ठाकरेंच्या मनसेसोबत भाजपा युती होणार का? अशी चर्चा सुरू आहे. अलीकडच्या काळात भाजपा नेत्यांचे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणं वाढलं आहे. राज ठाकरेंचे आक्रमक हिंदुत्व हे आगामी काळात भाजपाच्या सोयीचं होणार आहे. शिवसेनेमुळे मोकळी झालेली स्पेस मनसेला भरून काढता येणार का? हे आगामी काळात स्पष्ट होईल.