मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराचे वृत्त सोशल मीडियात झळकत होते. त्यातच आता एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र एकनाथ खडसे भाजपा सोडून कुठेही जाणार नाही, असा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
एकनाथ खडसे भाजपा सोडणार असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. मात्र रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसेंबाबत वक्तव्य करीत त्यांच्या दुसऱ्या पक्षातील प्रवेशांच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. रावसाहेब दानवे म्हणाले की, एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. भाजपा वाढविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. तसेच त्यांच्यासोबत मी सतत बोलत असतो. मी त्यांच्या संपर्कात आहे. ते भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत. पक्षामध्ये एखाद्याला संधी मिळते, तर असते एखाद्याला मिळत नाही. मात्र एकनाथ खडसे यांना नक्की संधी मिळेल, त्यांना काही आम्ही वाळीत टाकलेलं नाही, असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
भाजपाकडून आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खडसेंनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तर, विधानसभेला तिकीट कापण्यात आल्याचा आरोपही खडसेंकडून फडणवीस यांच्यावरच लावण्यात आला. त्यातच, नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीतही खडसेंना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे, खडसेंच्या संयमाचा बांध फुटला असून त्यांच्या डोक्यातील टीक टीक अखेर राष्ट्रवादीत जाऊन थांबली आहे.
ऑडिओ क्लीप व्हायरल
एकनाथ खडसेंना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले होते. त्यापैकीच, एका समर्थकाने थेट खडसेंना फोन करुन राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात विचारणा केली. त्यावर, अगोदर तिकडून प्रस्ताव तर येऊ द्या, ते आपल्याला मानाचं स्थान देणार का, याची खात्री करुनच आपण प्रवेश करूया, असे खडसेंनी म्हटले होते. खडसे आणि कार्यकर्त्याची ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. शिवसेनेत तर जाणार नाहीत खडसे ?
मुंबईत खडसे यांची राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवार यांच्या सोबत भेट होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, मुंबईत चार दिवस थांबून असताना खडसे आणि शरद पवार यांच्यात भेट झाली नाही. मध्यंतरी खडसे यांनी शिवसेनेत यावे, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांकडून होत होता. त्यात मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत यांच्यासह स्वतः गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. मात्र, खडसे यांनी याबाबत कोणतेही मत व्यक्त केले नव्हते.
शरद पवारांकडून चाचपणी
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या जळगावातील नेत्यांना मुंबईत बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चाचपणी केली होती. तेव्हापासून खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र, मुंबई दौरा केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात काही हालचाली झाल्या नाहीत. या साऱ्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगवून खडसे मागच्या दाराने शिवसेनेत तर जाणार नाहीत ना? अशीही चर्चा आता रंगू लागली. मात्र, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.