Join us

'तुम्हाला आर्यन शाहरुख खानची चिंता आहे का?'; गोपीचंद पडळकरांचा नवाब मलिक यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 4:33 PM

नवाब मलिक यांच्या या दाव्यानंतर भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे.

मुंबई: क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतरही काही आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी NCB वर गंभीर आरोप केले आहेत. 

क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात NCBने एकूण 11 जणांना ताब्यात घेतले होते. मग यातील तिघांना कुणाच्या निर्देशावरून सोडण्यात आले, असा प्रश्न मलिकांनी उपस्थित केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. . नवाब मलिक यांनी सलग तीन दिवस पत्रकार परिषद घेऊन मोठंमोठे खुलासे केले. हे सर्व खुलासे मलिकांनी पुराव्यासह दाखवले आहेत.

नवाब मलिक यांच्या या दाव्यानंतर भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे. नवाब मलीक यांना बीनबुडाचे आरोप करण्याची सवय झाली आहे. भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी आपली मतीही भंगरात विकली आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच त्या क्रूजवर तेराशे लोकं प्रवास करत होते. त्यात तुमचेही काही जवळचे होते आणि तपासानंतर ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला. त्यांनाच फक्त एनसीबीने अटक केलीये. उर्वरीत लोकाना एनसीबीने सोडलेले आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, तुमचं वसूली सरकार हे वसूलीत गुंग असल्यामुळे एनसीबी असो की दिल्लीतली एटीएस यांनाच कारवाई करावी लागत आहे. तुमच्या स्वत:च्या जावायाला ड्रग्स केसमध्ये अटक झाली असताना तेव्हा तुम्ही कशासाठी गप्प बसले होता?, असा सवाल उपस्थित करत नवाब मलिकांना मुळात आर्यन शाहरूख खानची चिंता आहे की त्यांना ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळक्यांची चिंता आहे? असे तर नाही ना की NCB ने सखोल तपास केल्यास तुमचे ड्रग्स टोळक्यांशी असणारे लागेबांधे ऊघडे पडणार आहेत ? या भितीपोटी तर तुम्हाला झोप लागत नाहीये ना, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत.

दरम्यान, मलिक म्हणाले, क्रुझवरील ड्रग्स पार्टीवर टाकलेल्या छाप्यात एनसीबीने 11 जणांना ताब्यात घेतले होते. या सर्वांना एनसीबी कार्यालयात नेण्यात आले. मात्र, अवघ्या तीन तासांतच भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित भारती यांचा मेहुणा वृषभ सचदेवा, प्रतिक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांना सोडण्यात आले. एनसीबीने कुणाच्या निर्देशावरून या तिघांना सोडले? आम्ही एनसीबीकडे यासंदर्भात सत्य काय, याचा खुलासा करण्याची मागणी करत आहोत. समीर वानखेडे आणि भाजप नेते यांच्यात काही चर्चा झाली असावी, असे आम्हाला वाटते, असेही मलिक यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :नवाब मलिकगोपीचंद पडळकरभाजपानार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोआर्यन खान