Maharashtra Budget Session: “लव्ह जिहादसह लँड जिहाद, अवैध धर्मांतराची प्रकरणे वाढतायत, लवकरच कायदा आणावा”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 09:40 AM2023-03-25T09:40:59+5:302023-03-25T09:41:40+5:30
Maharashtra Budget Session: लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणांसंदर्भात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत भूमिका मांडली.
Maharashtra Budget Session: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. विविध मुद्द्यांवरून या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. यातच विधान परिषदेचे भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांनी लव्ह जिहाद संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. बळजबरीने, फसवणुकीने होत असलेल्या धर्मांतरांना रोखण्याची मागणी त्यांनी केली. तसेच लव्ह जिहादबरोबरच लँड जिहाद आणि अवैध धर्मांतराची प्रकरणे वाढत चालली आहेत, याकडेही गोपीचंद पडळकर यांनी लक्ष वेधले.
लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि गोहत्या यासंदर्भात राज्यभरात ५४ ठिकाणी मोर्चे निघाले. लव्ह जिहादच्या घटना शहरात जास्त घडतात, हे ऐकले होते. मात्र, सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील गावापर्यंत याचे लोण पोहोचले आहे, अशी माहिती पडळकर यांनी सभागृहाला दिला. आटपाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये वेगवेगळी आमिषे दाखवून, तेथील लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन धर्मांतर करण्याचा सपाटा जोरात सुरू आहे, असा दावा पडळकर यांनी केला.
हिंदू वाल्मिकी समाजातील व्यक्तीचे बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रकार
दौंड तालुक्यातील एका हिंदू वाल्मिकी समाजातील व्यक्तीचे बळजबरी धर्मांतर करण्याचा प्रकार घडला. मात्र, त्या व्यक्तीने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. यामध्ये कुरेशी नावाची व्यक्ती सामील असून, कुरेशीच्या पत्नीनेच पोलिसांत जाऊन हिंदू मुलींच्या धर्मांतराबाबत माहिती दिली. त्यात स्वतःचा नवरा आणि त्याच्यासोबत अन्य सात ते आठ व्यक्ती असल्याचे या कुरेशीच्या पत्नीने सांगितले. मात्र, तरीही पोलिसांनी दखल घेतली नाही, असेही पडळकर यांनी सांगितले.
दरम्यान, लव्ह जिहाद’च्या आजवरच्या प्रकरणांमध्ये एक निश्चित कार्यपद्धती असल्याचे प्राथमिक तपासात जाणवते, ही बाब नाकारण्यात अर्थ नाही. या विषयावर हजारोंचे मोर्चे निघत असताना ही केवळ बहुसंख्यकांची मागणी आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात अर्थ नाही, असे स्पष्ट करत ‘लव्ह जिहाद’बाबत राज्य सरकार गंभीर असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधात लवकरच कायदा करणार असून, त्यासाठी विविध राज्यांच्या कायद्यांचाही अभ्यास केला जात असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"