West Bengal Election 2021: पश्चिम बंगालच्या नागरिकांनी पुन्हा एकादा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला बहुमत दिलं आहे. तृणमूल काँग्रेसने २१३ जागांवर विजय मिळवला असून भाजपाला १०० च्या आतच रोखण्यात ममता बॅनर्जी यांना यश आलं आहे. भाजपाने ७७ जागांवर विजय मिळवला आहे.
ममता बॅनर्जी यांनी भाजपाला एकहाती धूळ चारल्यानंतर आता देशभरात त्यांच्या या विजयाची चर्चा सुरु आहे. याचदरम्यान भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कैलास विजयवर्गीय यांच्या विधानाचा हवाला देत एक ट्विट केले आहे. तसेच भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनीच हा गौप्यस्फोट केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सर्व भाजपाविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्यानं मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसला, असं कैलास विजयवर्गी यांनी म्हटल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कैलास विजयवर्गी यांच्या या विधानावरुन पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात होता, असा निष्कर्ष जितेंद्र आव्हाड यांनी काढला आहे.
तत्पूर्वी, निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपाला ५० पेक्षा अधिक जागाही मिळाल्या नसत्या, असा गंभीर आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये यावेळी निवडणूक आयोगाची वागणूक भयानक होती. निवडणूक आयोगाचं पॅनल भाजपाचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. जर निवडणूक आयोगानं भाजपाला मदत केली नसती तर त्यांना ५० जागाही मिळाल्या नसत्या, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच मी रस्त्यावर उतरुन लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की, आम्ही दोनशेपार जाऊ तर भाजपा ७० पारही जाणार नाही, असं ममता बॅनर्जी यांनी मुलाखतीत सांगितलं.
नंदीग्रामच्या लढतीवरही ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नंदीग्राममधील पराभव हे आमचं नुकसान नाही. कारण या ठिकाणी मतमोजणीत छेडछाड करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. तसेच मतदानाच्या दिवशी मी स्वतः मतदान केंद्राच्या बाहेर तीन तास बसून होते, कारण याठिकाणी कोणालाही मतदान करु दिलं जात नव्हतं, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.