'सत्तेसाठी विरोधकांशी आघाडी करणं, हे हिंदुत्व नव्हे'; आदित्य ठाकरेंच्या टीकेला भाजपाचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 07:58 PM2022-12-01T19:58:11+5:302022-12-01T20:00:01+5:30
आदित्य ठाकरेंच्या या टीकेवर भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई- मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्य्रातून सुटकेशी केल्याने नवा वाद सुरू झाला आहे. दरम्यान, ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात एक ट्विट करून आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-भाजपा सरकारवर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हे हिंदुत्व नाही. हा महाराष्ट्र द्वेष आहे. ‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरेंच्या या टीकेवर भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. निवडणूकीत लोकांना दिलेल वचन मोडून सत्तेसाठी विरोधकांशी आघाडी करणं हे हिंदुत्व नव्हे...मुंबईत बॅाम्बस्फोट करणाऱ्या दाऊदसोबत व्यवहार करणाऱ्यासोबत मांडी लावून बसणे हे मराठी प्रेम नव्हे...उद्योग गेल्याच्या खोट्या कंड्या पिकवणे हे महाराष्ट्र प्रेम नव्हे...हा तर महाराष्ट्र द्रोह, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
◾️निवडणूकीत लोकांना दिलेल वचन मोडून सत्तेसाठी विरोधकांशी आघाडी करण हे हिंदुत्व नव्हे
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 1, 2022
◾️मुंबईत बॅाम्बस्फोट करणाऱ्या दाऊद सोबत व्यवहार करणाऱ्यासोबत मांडी लावून बसणे हे मराठी प्रेम नव्हे
◾️उद्योग गेल्याच्या खोट्या कंड्या पिकवणे हे महाराष्ट्र प्रेम नव्हे
हा तर महाराष्ट्र द्रोह https://t.co/hJt54mfkHS
दरम्यान, काल साताऱ्यात प्रतापगड येथे शिवप्रताप दिनी झालेल्या कार्यक्रमामध्ये मंगलप्रभात लोढा यांनी शिंदेंच्या बंडाची तुलना आग्य्रातून सुटकेशी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्य्रातील किल्ल्यात ठेवले होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आग्य्रातून नाट्यमयरीत्या सुटका करून घेतली होती. ते तिथून सुटून बाहेर आले त्यामुळेच ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. त्याचप्रकारे एकनाथ शिंदे यांना रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र एकनाथ शिंदे बाहेर पडले, असे विधान मंगलप्रभात लोढा यांनी केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"