Join us  

BJP vs Mahavikas Aaghadi, Keshav Upadhye: राज्य सरकारने दारूप्रमाणेच पेट्रोल-डिझेलवरील करातही ५० टक्के कपात करावी; भाजपाच्या केशव उपाध्येंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 3:45 PM

केंद्राशी संघर्ष करण्याच्या खुमखुमीतून राज्य सराकरचा कपटी खेळ उघड झाला- केशव उपाध्ये

BJP vs Mahavikas Aaghadi, Keshav Upadhye: केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी इंधनावरील अबकारी कर कमी केले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये अनुक्रमे २.०८ रुपये व १.४४ रुपये कपात केली. याच मुद्द्यावरून प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. "जनतेच्या खिशातून हजारो कोटींची लूट केल्यानंतर आता राज्य सरकारने मूल्यवर्धित करामध्ये कपातीचा केवळ कागदी गाजावाजा केला. ठाकरे सरकारने पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धुळ फेकली आहे. महागाईने त्रासलेल्या जनतेस दिलासा देण्यासाठी ठाकरे सरकारने दारूप्रमाणे पेट्रोल-डिझेल वरील करातही तातडीने ५० टक्के कपात करून जनतेला दिलासा द्यावा", अशी मागणी केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

"पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याची केवळ घोषणा न करता त्याबाबतचा शासन आदेश (जीआर) जारी करावा. केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात करून जनतेला मोठा दिलासा दिल्यावर ठाकरे सरकारने दीड ते दोन रुपये कपात करून राज्यातील जनतेची क्रूर चेष्टा केली. महाराष्ट्रात पेट्रोलवर लिटरमागे ३२.५५ रुपये तर डिझेलवर लिटरमागे २२.३७ रुपये एवढा कर राज्य सरकार आकारते. केंद्र सरकारने कर कपात करून राज्याचा कर कमी करण्याचे आवाहन केल्यानंतरही ठाकरे सरकारने कर कमी केले नाहीत, उलट अनावश्यक वाद घालून राजकारण सुरू ठेवले. एकीकडे महागाईच्या नावाने सत्ताधाऱ्यांनीच निदर्शने करायची आणि दुसरीकरे कर कपात न करता जनतेची लूट सुरूच ठेवायची असा दुटप्पी डाव महाविकास आघाडी खेळत असून केंद्राशी संघर्ष करण्याच्या खुमखुमीतून जनतेला महागाईच्या दरीत ढकलण्याचा कपटी खेळ उघड झाला आहे", असा टोला त्यांनी लगावला.

दारूवरील करात जितकी कपात, तितकी पेट्रोल-डिझेलमध्येही करा!

"ठाकरे सरकारने दारुवरील करात तब्बल ५० टक्क्यांची कपात करून दारू उत्पादकांना मोठा मलिदा मिळवून दिला. मात्र इंधनाच्या किंमती कमी झाल्यास महागाई कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल हे ठाऊक असूनही पेट्रोलवर जेमतेम दोन रुपयांची कपात करून जनतेला दिलासा नाकारला. विदेशी मद्याला दिलेल्या सवलतीप्रमाणेच पेट्रोल डिझेलवरील राज्याच्या व्हॅट आकारणीतही ५० टक्के कपात झाली पाहिजे", अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली.

"आपण धूर्त राजकारणी आहोत असे सांगत मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. आता कर कपातीचे गाजर दाखवून जनतेला राज्य सरकारकडून प्रत्यक्षात कोणताच लाभ मिळणार नाही याची काळजी घेत ठाकरे यांनी पुन्हा तेच दाखवून दिले. मुळात ठाकरे सरकारने कर कपातीचा केवळ कागदावरच गाजावाजा केला असून ही कर कपात प्रत्यक्षात आणून जनतेला दिलासा देण्याची इच्छा नसल्यामुळे त्या संबंधीचा अधिकृत आदेश जारी करण्यातही ठाकरे सरकार टाळाटाळ करीत आहे", अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :पेट्रोलडिझेलमहाविकास आघाडीभाजपा