मुंबई: महाराष्ट्राचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले. तिथे त्यांची सुमारे तासभर चौकशी करण्यात आली. त्यानंतर अधिकारी नवाब मलिक यांना सकाळी साडेसातच्या सुमारास ईडी कार्यालयात घेऊन गेले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडी कार्यालयात मलिकांची चौकशी सुरू करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप आणि केंद्रावर जोरदार टीका केली. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नवाब मलिकांवरील ईडी कारवाईवर प्रतिक्रिया दिली. नवाब मलिक यांची हकालपट्टी करायला लावणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.
किरीट सोमय्या यांनी रश्मी उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांच्या कथित घोटाळ्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे माफियाखोरांना मदत करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सकाळपासून किरीट सोमय्या-ई़डी कनेक्शनचा धोशा लावला आहे. मी दिलेली माहिती खरी आहे की नाही, यावर कोणीही बोलतच नाही, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला लावणार
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला लावणार, असे म्हटले आहे. नवाब मलिक यांचे कारस्थान आता जनतेसमोर येत आहे. अशा व्यक्तीला तांत्रिकदृष्ट्या मंत्रिमंडळात राहण्याचा हक्क आहे का, हे तपासले पाहिजे. ईडीच्या चौकशीची माहिती समोर आल्यानंतर भाजपकडून नक्कीच नवाब मलिक यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी मागणी केली जाईल, असे सोमय्या यांनी स्पष्टच सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार ईडीच्या कारवाईविषयी संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न का करत आहेत. किरीट सोमय्या याच्याकडे कुठून माहिती येते हा मुद्दा महत्त्वाचा नाही. ती माहिती चुकीची आहे का ते सांगा. माहिती चुकीची असल्यास ईडीची कारवाई थांबवली जाईल. ही माहिती ठाकरे सरकारला होती तर त्यांनी अगोदरच कारवाई करायला पाहिजे होती. पण मी देखील कारवाई करणार नाही, तुम्हीही करू नका, ही ठाकरे सरकारची भूमिका योग्य नसल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.