मुंबई: भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवडी न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. किरीट सोमय्यांना १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा पुन्हा न करण्यासह कठोर अटीं सह जामीन दिला आहे.
सोमय्या आज शिवडी न्यायालयासमोर हजर झाले आणि त्यांनी त्यांच्या ट्विटर फीडच्या विरोधात दोषी नसल्याची बाजू मांडली. प्रवीण कलमे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध कथित बदनामीकारक वक्तव्यासाठी किरीट सोमय्या यांच्याविरोधात अर्थ एनजीओने आणि सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कलमे यांनी दोन स्वतंत्र बदनामीचे खटले कोर्टात दाखल केले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे.
सोमय्यांनी काय केले होते आरोप?गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण विभाग, एसआरए तसेच म्हाडा या संस्थांमध्ये काम करणाऱ्या बिल्डरांकडून 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश प्रवीण कलमे (Pravin Kalme) यांना दिले आहेत. प्रवीण कलमे हे या सरकारी संस्थांमधील सचिन वाझे आहेत, असे आरोप किरीट सोमय्या यांनी एप्रिल महिन्यात केले होते.
कलमे यांचे सोमय्या यांच्यावर गंभीर आरोपसोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. मात्र, आता प्रविण कलमे यांनीसुद्धा सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुकेश दोषी यांची क्रिस्टल प्राईड आणि आनंद पंडित यांची लोटस डेव्हलपर्स या दोन बिल्डरसाठी सोमय्या यांनी जिवाचं रान केलं आहे. आनंद पंडित हे किरीट सोमय्या यांच्या संस्थेत पदाधिकारी आहेत. आनंद पंडित यांच्याकडून सोमय्या यांच्या संस्थेला आर्थिक मदत येते, असा आरोप कलमे यांनी सोमय्या यांच्यावर केला आहे.