Join us

मुंबई महापालिकेच्या सभागृहाचा शेवटचा दिवस; मुंबईकरांची आज मुक्तता होणार, सोमय्यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 2:48 PM

मुंबई महापालिकेच्या विद्यमान सभागृहाचा शेवटचा दिवस असल्यानं भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी महापालिकेचे महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या मुंबई महापालिकेच्या विद्यमान सभागृहाचा आज अखेरचा दिवस आहे. स्थायी समितीची अखेरची बैठक होत असून, सुमारे १६०पेक्षा अधिक प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.

शहर व उपनगरातील विविध विकासकामे व योजनांवर कोट्यवधीचे हे प्रस्ताव आहेत. या बैठकीत त्यापैकी किती प्रस्तावांना मंजुरी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अखेरचा दिवस असल्याने मंगळवारपासून महापालिकेवर प्रशासक नेमला जाईल. निवडणूक होऊन नवीन सभागृह अस्तित्त्वात येईपर्यंत आयुक्त इक्बालसिंह चहल हे महापालिकेचे प्रशासक म्हणून काम पाहतील.

मुंबई महापालिकेच्या विद्यमान सभागृहाचा शेवटचा दिवस असल्यानं भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी महापालिकेचे महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्यावर टीका केली आहे. गरिब झोपडपट्टीवासियांचे SRAचे गाळे ढापणाऱ्या मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर व नाले सफाई कॉन्ट्राक्टरशी संगनमत करून शेकडो कोटीचे घोटाळे करणारे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यापासून आज मुंबईकरांची मुक्तता होणार, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. 

दरम्यान, २५ फेब्रुवारीला स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर दोन तारखेला झालेल्या काही समितीच्या सभेत स्थायी समितीच्या सभेत १७९पैकी निम्मे प्रस्ताव राखीव ठेवण्यात आले होते. या प्रस्तावात आणखी काही नव्या प्रस्तावांची भर घालून आज सोमवारी या सभेत सादर करण्यात येत आहेत. त्यामध्ये पूर्व पश्चिम उपनगर दक्षिण मुंबईतील विकासकामांबाबतचे अनेक ठराव आहेत. अखेरच्या स्थायी समितीच्या सभेत प्रस्तावित अर्थसंकल्पालाही मान्यता दिली जाईल. विरोधक भाजप पक्षाचे सदस्य या बैठकीत कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकिशोरी पेडणेकरकिरीट सोमय्या