अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार; सोमय्यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 05:41 PM2021-05-30T17:41:02+5:302021-05-30T17:41:43+5:30

राज्यपालांनीही परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, असं किरीट सोमय्या यांनी सांगितले. 

BJP leader Kirit Somaiya has demanded legal action against Minister Anil Parab | अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार; सोमय्यांचा खळबळजनक दावा

अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार; सोमय्यांचा खळबळजनक दावा

Next

मुंबई:  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीचे गंभीर आरोप झाल्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह परिवहन विभागातील अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.

परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो असा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने 300 कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचा या तक्रारीत म्हटलं आहे.

अनिल परब यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल झाल्यानंतर भाजपाने पुन्हा महाविकास आघाडी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. अनिल परब हे केवळ दोन महिन्यांचे पाहुणे आहेत. त्यांची मंत्रिमंडळातील गच्छंती अटळ आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. या सगळ्या घोटाळ्यांची विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असून राज्यपालांनीही परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, असं किरीट सोमय्या यांनी सांगितले. 

संबंधित प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. पोलीस उपायुक्त (क्राईम ब्रांच) आणि इतर दोन उपायुक्त या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पाच दिवसात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. दरम्यान गजेंद्र पाटील अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. ते 31 मे नंतर हजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अनिल परब यांनी आरोप फेटाळले-

विभागातील अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करुन माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे", असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत ट्विटर अकाऊंटवर स्पष्टीकरण दिलं आहे. 

"मंत्र्यांवर आरोप करुन राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून उच्च न्यायालयामार्फत सीबीआय चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मलिन करणे, या राजकीय हेतून केलेली ही तक्रार आहे", असं ट्विट अनिल परब यांनी केलं आहे. निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर पाच अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक येथे दिलेली तक्रार पूर्णत: निराधार आणि खोटी असल्याचं परब यांनी म्हटलं आहे. या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करत असून चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

Web Title: BJP leader Kirit Somaiya has demanded legal action against Minister Anil Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.