"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 13:46 IST2024-11-30T13:39:07+5:302024-11-30T13:46:12+5:30
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्याविरोधात निवडणूक आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Kirit Somaiya Complains Against Bhai Jagtap : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाबाबत भाई जगताप यांनी वापरलेल्या चुकीच्या शब्दाबाबत किरीट सोमय्या यांनी ही तक्रार दाखल केली आहे. भाई जगताप यांनी निवडणूक आयोगाचा श्वान म्हणून उल्लेख केला. त्यानंतर सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत तक्रार केली आहे. सोमय्या यांनी पोलीस आयुक्तांकडेही कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवडणूक आयोगाला शिवीगाळ केल्याप्रकरणी काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाई जगताप यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना निवडणूक आयोगाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्यानंतर आता किरीट सोमय्यांनी संताप व्यक्त करत तक्रार दाखल केली आहे.
"मी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रारही केली आहे. हा प्रकार, घटनात्मक संस्था असलेल्या निवडणूक आयोगाचा अपमान सहन केला जाणार नाही. भाई जगताप यांच्यावर कारवाई करायला हवी. काँग्रेस निवडणूक आयोगाला लक्ष्य करत आहे कारण ते मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला घाबरत आहेत. गेल्या दोन दिवसांत, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्वजण ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य करत आहेत कारण सर्वजण मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना घाबरत आहेत," असं सोमय्या म्हणाले.
काय म्हटलंय पत्रात?
"महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचा पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाला बदनाम करण्याची मोहीम काँग्रेस, विरोधीपक्षाचे आमदार व आमदार भाई जगताप यांनी सुरु केली आहे. आमदार भाई जगताप यांनी निवडणूक आयोगाला पंतप्रधान नरेंद्र मोदी/भाजपचा कुत्रा म्हटले आहे. निवडणूक आयोगाला असे कुत्रा म्हणजेच शिवी देणे, अवमान करणे हे संविधानात्मक संस्थेचा अपमान आहे. आमदार भाई जगताप यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करावी ही विनंती," असं किरीट सोमय्या यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
I filled complaint with Election Commission & Police Commissioner Mumbai to take action against Congress Bhai Jagtap for abusing Election Commission
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 30, 2024
निवडणूक आयोगाल कुत्रा शिवी बद्दल काँग्रेस भाई जगताप वर कारवाई करण्यासाठी मी निवडणूक आयोग आणि पोलीस आयुक्तां कडे तक्रार केली आहे pic.twitter.com/TZpyfN4jLy
काय म्हणाले भाई जगताप?
"मी एकटा नाही. मी ४५-४७ वर्षे राजकारणात घालवली. महाराष्ट्रात असे निकाल लागलेले नाहीत. हा ईव्हीएमचा खेळ आहे, असे मी पूर्वीपासून म्हणत आलो आहे. आज नाही तर उद्या चर्चा व्हायला हवी. बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. लोकशाहीवर प्रश्न उपस्थित होत असतील तर सरकार आणि निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे. निवडणूक आयोग म्हणजे नरेंद्र मोदींच्या बंगल्याबाहेर बसलेला कुत्रा आहे," असं भाई जगपात यांनी म्हटलं.
दरम्यान, भाई जगताप यांनी निवडणूक आयोगाबाबतच्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल माफी मागण्यास नकार दिला. "मी अजिबात माफी मागणार नाही, किंचितही नाही. ते पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असतील तर मी जे बोललो ते योग्य आहे. मी माफी मागणार नाही. या निवडणूक आयोगाने टीएन शेषन यांच्याप्रमाणे काम करावे,निवडणूक आयोगाच्या आडमुठेपणामुळे लोकशाही बदनाम होत आहे," असं भाई जगताप यांनी म्हटलं.