Join us  

संजय राऊतांनी काढली 'INS विक्रांत फाईल'; किरीट सोमय्या म्हणाले ते फक्त टाइमपास करू इच्छितात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 11:24 AM

संजय राऊतांच्या या आरोपानंतर आता किरीट सोमय्या यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली गोळा केलेल्या रकमेचं काय झालं, ती रक्कम कुठे गेली, असे प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत. सोमय्यांनी गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचं आरटीआयमधून समोर आलं आहे. लोकांच्या देशप्रेमाशी खेळून सोमय्यांनी गद्दारी केलं आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांनी करावा, असं आवाहन राऊत यांनी केलं. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या निधीचं काय झालं, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण तो देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. लोकांनी मोठ्या विश्वासानं विक्रांत वाचवण्यासाठी देणगी दिली. त्या निधीचं काय झालं, याचं उत्तर लोकांना मिळायला हवं. सध्या भाजपचं कार्यालय झालेल्या राजभवनानं आपल्याला सोमय्यांकडून कोणताच निधी किंवा चेक मिळाला नसल्याचं म्हटलं आहे. त्याची कागदपत्रं माझ्याजवळ आहेत. या विक्रांत फाईल्स काश्मीर फाईल्सपेक्षा गंभीर आहेत, असं राऊत म्हणाले.

संजय राऊतांच्या या आरोपानंतर आता किरीट सोमय्या यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ईडीच्या कारवाईमुळे संजय राऊत गोंधळलेले आहेत. किरीट सोमय्याने काही केले असेल, तर त्याचे पुरावे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावे. त्यांनी अनेक आरोप केले. मात्र, त्यांना पुरावे मिळालेच नाहीत. ते फक्त टाइमपास करू इच्छितात, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. 

दरम्यान, विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा सोमय्यांनी घोटाळा केल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. सोमय्यांनी देशाशी गद्दारी केली आहे. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. राज्याच्या हद्दीत हा गुन्हा घडल्यानं राज्यातील तपास यंत्रणांनी कारवाई करायला हवी. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यानं केंद्रीय तपास यंत्रणांनीदेखील तपास करायला हवा, असं राऊत यांनी म्हटलं.

२०१३ मध्ये विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी मोहीम सुरू केली. केंद्र आणि राज्य सरकारांनी असमर्थतता दर्शवल्यानं महात्मा सोमय्या पुढे आले आणि निधी गोळा केला. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर, विमानतळावर डबा घेऊन उभे राहिले. विक्रांत देशाच्या दृष्टीनं अभिमानाचा विषय असल्यानं लोकांनी सढळ हस्ते दान केलं. नेव्हीनगरमध्ये राहणाऱ्या नौदलाच्या अनेक अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये दिले. या रकमेचं सोमय्यांनी काय केलं ते देशाला समजायला हवं, असं राऊत म्हणाले. सोमय्यांनी गोळा केलेला पैसा राजभवनात जमा झाला नाही, मग तो कोणाच्या खिशात गेला? हा पैसा कोणी खाल्ला? तो खाऊन कोणी ढेकर दिला? अशी प्रश्नांची सरबत्तीच राऊत यांनी केली.

टॅग्स :संजय राऊतकिरीट सोमय्याशिवसेनाभाजपा