Video:'एक तर घरी जाऊ द्या, नाही तर १५ हजार द्या'; वांद्र्यातला 'तो' व्हिडीओ भाजपाने केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 02:46 PM2020-04-15T14:46:07+5:302020-04-15T14:54:30+5:30

केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्यानंतर परराज्यातील मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं.

BJP leader Kirit Somaiya has written to government requesting a crowd inquiry near Bandra mac | Video:'एक तर घरी जाऊ द्या, नाही तर १५ हजार द्या'; वांद्र्यातला 'तो' व्हिडीओ भाजपाने केला शेअर

Video:'एक तर घरी जाऊ द्या, नाही तर १५ हजार द्या'; वांद्र्यातला 'तो' व्हिडीओ भाजपाने केला शेअर

googlenewsNext

मुंबई: कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्याने तणाव निर्माण झाला होता. काही मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी सुमारे ८०० ते १००० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या संबंधित अफवा पसरवण्यासाठी कारणीभूत असलेल्या विनय दुबेलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  वांद्र्यात हा सर्व प्रकार घडल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. मात्र आता भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करुन हा सर्व प्रकार नियोजित केला असल्याचा दावा देखील केला आहे.

किरीट सोमस्या यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण हे घरी जाण्यासाठी इथं जमलो असल्याचं सांगत आहे. तसेच आम्हाला घर नको, जेवण नको आहे. आम्हाला फक्त घरी जायचं आहे असं जमलेले लोक म्हणत आहे. परंतु ज्या तरुणाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, तो तिथे जमलेल्या तरुणांना 'घरी जाऊ द्या किंवा 15 हजार रुपये द्या', असं बोलण्यास सांगत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सरकारला पत्र लिहून किरीट सोमय्या यांनी या व्हिडिओबाबत कठोर चौकशी करण्याची मागणी केली आहे.

जी उपाययोजना करायची आहे, ती सगळी पावलं टाकली जात आहेत, वैद्यकीय खबरदारी घेतली जातेय, अन्न-धान्याची पूर्तता, कष्टकरी-कामगार वर्ग यांची काळजी घेतली जात आहे. वांद्रे स्टेशनजवळ घडलेला प्रसंग दुर्दैवी आहे, कुणीतरी रेल्वेबाबत अफवा पसरवली, डिस्टन्सिंगच्या सूचना पाळल्या गेल्या नाहीत, जे काल घडलं, ते यापुढे घडू नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. राजकीय पक्षांना आवाहन करतो की, राजकारण लोकशाहीत चालतच असतं, पण ही वेळ राजकारणाची नाही, देशावर गंभीर संकट आहे अन् प्रशासनावर ताण आहे, जे एकत्रितपणे काम करत आहेत, त्यांना सहकार्य करा, पक्ष विसरून सरकारला मदत करा, असं आवाहनही पवारांनी केलं आहे.   

केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्यानंतर परराज्यातील मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. मुंब्रापाठोपाठ वांद्रे बस डेपो परिसरातील हजारोंच्या संख्येत रस्त्यावर जमाव उतरला होता. आम्हाला आमच्या मुळगावी जाऊ द्या अशी मागणी या मजुरांनी केली आहे. या जमलेल्या जमावामुळे परिसरात लॉकडाऊनची ऐशीतैशी झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले होते.

दरम्यान, फेसबुकवरून विनय दुबेने मजुरांना उद्देशून एक व्हिडीओ १२ एप्रिल रोजी पोस्ट केला होता. यात त्याने मजुरांना आता मदतीसाठी नाही तर गावी जाण्यासाठी लढण्याचे आवाहन केले. शिवाय याविरुद्ध मोहीम छेडण्यासाठी स्वत:चा मोबाईल क्रमांक शेअर केला आहे. हा व्हिडीओ १६ हजारांहून अधिक जणांनी शेअर केला होता. तसेच यापूर्वी परप्रांतीयांसाठी विशेष ४० बसेसची व्यवस्था केल्याचा व्हिडीओही अपलोड केला होता. तो २१ हजार लोकांनी शेअर केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्याने अशा प्रकारे मोहीम छेडल्याचे समोर आले आहे.

Web Title: BJP leader Kirit Somaiya has written to government requesting a crowd inquiry near Bandra mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.