Join us  

Kirit Somaiya: “माझ्यावरील हल्ल्याची CBI चौकशी व्हायला हवी”; किरीट सोमय्यांची हायकोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 9:52 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलिस आयुक्त संजय पांडे यांची तक्रार किरीट सोमय्यांनी याचिकेत केल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या गाडीवर खार पोलीस ठाण्यासमोर दगडफेक करण्यात आली. यावेळी काच फुटल्यानंतर किरीट सोमय्या यांच्या हनुवटीला जखम झाली होती. शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला, असा मोठा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. यासंदर्भात या हल्ल्याची सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती खुद्द किरीट सोमय्या यांनी दिली आहे. 

माझ्यावरील शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. माझ्यावर हल्ल्ला केलेल्या शिवसेनेच्या गुंडांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांची तक्रारही किरीट सोमय्या यांनी आपल्या याचिकेत केल्याचे सांगितले जात आहे. 

सोमवारी तत्काळ सुनावणी घेण्यासंदर्भात विनंती करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे खोटे एफआयआर दाखल करतात. खार पोलीस स्टेशनच्याबाहेर शिवसेनेच्या ७० ते ८० गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. या खोट्या एफआयआरच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित दाखल केली आहे. उच्च न्यायालयाला सोमवारी याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची विनंती करणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

दरम्यान, या हल्ल्यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी थेट दिल्लीत धाव घेतली आणि केंद्रीय गृहसचिवांकडे या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. या हल्ल्यात किरीट सोमय्या यांना झालेली दुखापत गंभीर नसल्याचे भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाल्याचे समोर आले आहे. तसेच रक्तस्त्राव झाला नव्हता, असे वैद्यकीय तपासणीच्या अहवालात नमूद करण्यात आले. 

टॅग्स :किरीट सोमय्यामुंबई हायकोर्ट