Join us

Sanjay Raut: “संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार, सगळा हिशोब द्यावाच लागेल”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 9:35 AM

Sanjay Raut: महाविकास आघाडीने संजय राऊतांना वाचवण्याचा प्रयत्न केला. झुकेगा नहीं वगैरे म्हणणाऱ्यांना आता कळेल, अशी टीका भाजपने केली आहे.

मुंबई: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम सकाळीच संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. शोधमोहिम आणि चौकशी सुरू असून, संजय राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. यातच आता यासंदर्भात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार, सगळा हिशोब द्यावा लागणार, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. 

किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत, संजय राऊत यांची जागा नवाब मलिक यांच्या शेजारीच असावी, अशी राज्यातील साडेबारा कोटी जनतेची इच्छा आहे. तसेच राऊत हे परदेशात कुटुंबासह फिरायला जात होते. त्याचा पैसा आला कुठून? त्यांचे हॉटेलचे बिल कोण देत होते? असा सवाल करतानाच राऊतांना हिशोब तर द्यावाच लागणार, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पत्राचाळमध्ये १२०० कोटींचा घोटाळा झाला

संजय राऊत आणि तत्कालीन सरकारने माफिया पद्धतीने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले होते. संजय राऊत हे प्रत्येक व्यक्तीला तुरुंगात टाकणार असल्याचे सांगत होते. धमक्या देत होते. काही लोकांना आतही टाकले आहे. पत्राचाळमध्ये १२०० कोटींचा घोटाळा झाला. त्यासोबत नायगाव वसई प्रकरण बाहेर यायचे आहे. संजय राऊत यांची लूटमार, माफियागिरीचे मी पुरावे दिले होते. महाविकास आघाडी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. राज्यातील जनतेची लूट करणाऱ्या संजय राऊतांचा हिशोब होणार आहे, अशी घणाघाती टीका किरीट सोमय्या यांनी केली. 

दरम्यान, रोज सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब झाल्याचे समाधान आहे. पत्राचाळीतील लोकांना आता न्याय मिळेल, असे वाटत आहे. झुकेगा नहीं वगैरे म्हणणाऱ्यांना आता कळेल. भ्रष्टाचार, महिला अत्याचार करायचा आणि आपल्याला काहीच होणार नाही असे त्यांना वाटायचे. मात्र आता त्यांना कळेल. पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केलेली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात शिक्षा व्हायलाच हवी. भ्रष्टाचाराची किंमत चुकवावी लागेल तर तुम्ही कुणीही असलात तरी चौकशी होणारच, असे भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :संजय राऊतकिरीट सोमय्याअंमलबजावणी संचालनालय