गडकरी, दानवेंनंतर भाजपचा आणखी एक बडा नेता राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांचा उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:26 AM2022-04-13T11:26:32+5:302022-04-13T11:28:58+5:30
काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेला; काही वर्षांपूर्वी राज यांच्यावर जोरदार टीका करणारा नेता शिवतिर्थावर
मुंबई: हिंदुत्वावरून अतिशय आक्रमक भूमिका घेतलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भाषणांची जोरदार चर्चा आहे. भाजपचे नेते राज ठाकरेंच्या भेटीगाठी घेत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांनी गेल्या काही दिवसांत राज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर आता भाजप नेते कृपाशंकर सिंह राज यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
कधीकाळी एकमेकांवर टीका करणाऱ्या नेत्यांची भेट
कृपाशंकर सिंह मुंबईतील उत्तर भारतीय समाजाचे महत्त्वाचे नेते मानले जातात. सिंह गेल्या वर्षी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले. राज यांनी मनसेच्या स्थापनेनंतर मराठीचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतला. परप्रांतीयांविरोधात भूमिका घेतली. त्यावेळी कृपाशंकर सिंह यांनी राज यांच्यावर टीका केली होती. राज यांनी त्यांच्या टीकेला जाहीर सभांमधून प्रत्युत्तर दिलं. या दोन नेत्यांमधलं वाकयुद्ध त्यावेळी चांगलंच रंगलं होतं. मात्र आता राज यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर कधीकाळी एकमेकांवर टीका करणाऱ्या नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
मी कुठे भूमिका बदलली?- राज ठाकरे
राज यांनी गुढीपाडव्याच्या सभेत उत्तर प्रदेश सरकारचं कौतुक केलं. त्यावरून महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी राज यांच्यावर टीका केली. त्या टीकेला राज यांनी काल उत्तर दिलं. माध्यमात उत्तर प्रदेशच्या विकासाच्या ज्या बातम्या येत आहेत, तशीच त्या राज्याची प्रगती झाली असल्यास चांगलंच आहे, असं मी म्हणालो होतो. जर-तर या शब्दांचा वापर मी केला होता, असं राज काल ठाण्यातल्या सभेत म्हणाले. मुंबईवरील लोकसंख्येचा बोजा कमी करायचा असल्यास उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडचा विकास व्हायला हवा, मोदींनी पंतप्रधान झाल्यावर त्याकडे लक्ष द्यायला हवं, हे मी २०१४ च्या आधीच म्हटलं होतं, याची आठवण राज यांनी काल करून दिली.
राज यांच्याकडून शिवसेनेची स्पेस व्यापण्याचा प्रयत्न?
शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानंतर विरोधकांची स्पेस व्यापण्याचा प्रयत्न मनसे प्रमुख राज ठाकरेंकडून सुरू आहे. राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेलेल्या शिवसेनेची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काहीशी गोची होत असताना पाहायला मिळतं. तर दुसरीकडे राज यांनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. पक्ष स्थापनेनंतर मराठी भाषा, मराठी पाट्या, भूमिपुत्रांना रोजगार, परप्रांतीयांना विरोध करणारे राज ठाकरे आता हनुमान चालिसा, अजान, मशिदीवरील भोंगे यावरून आक्रमक झाले आहेत. राज यांची भूमिका भाजपच्या अजेंड्याशी मिळतीजुळती असल्याचं बोललं जात आहे. राज यांच्या भाषणांच भाजप नेत्यांकडून कौतुकही होत आहे.