अतुल कुलकर्णी - मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमच्याकडे येऊ इच्छिणा:या नेत्यांची रांग लागली आहे, लवकरच अनेक मोठे नेते आमच्याकडे आलेले दिसतील असे पतंग उडविण्यातच सध्या भाजपा नेते मश्गुल झाले आहेत. मात्र दखल घ्यावी असा राज्यातला एकही मोठा नेता भाजपाच्या गळ्याला अद्याप लागलेला नाही. त्याउलट शिवसेनेत मात्र गेल्या काही दिवसात अनेकांनी प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा नेत्यांना राज्यातही स्वबळावर सत्ता मिळण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. शिवसेना-भाजपाचा जागा वाटपाचा फॉम्यरूला 171-117 असा होता. शिवसेनेने त्यांच्या 171 मधील 4 जागा शेकापला आणि 2 जागा स्वाभिमानी पक्षाला सोडल्या होत्या. चिमूर आणि गुहागर या दोन जागा मुंडेंच्या आग्रहावरुन भाजपाला देण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेने 163 तर भाजपाने 119 जागा लढवल्या होत्या. त्यात सेनेने 44 तर भाजपाने 46 जागा जिंकल्या होत्या.
भाजपाचे गल्ली ते दिल्लीचे सगळे नेते शिवसेनेसोबतची युती तुटली तरी बेहत्तर असे खाजगीत बोलून दाखवत आहेत. आमच्याकडे अनेक मोठे नेते येण्यासाठी उत्सूक आहेत असे सांगत भाजपाने दबावाचे राजकारण सुरु केले आहे. एका नेत्याची प्रतिक्रीया बोलकी आहे. गोपीनाथ मुंडे होते त्यावेळी त्यांच्याकडे पाहून भाजपात जाण्याची तयारी काहींनी केली होती मात्र मुंडेंच्या दुर्देवी मृत्यूनंतर सामूहिक नेतृत्वाची भाषा करणा:या भाजपात कोणाकडे पाहून जायचे असा प्रश्न अन्य पक्षाचे नेते उपस्थित करत आहेत. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार आणि एकनाथ खडसे यांच्यापैकी कोणालाही पक्षातलाच एखादा कार्यकर्ता आधी भेटला तरी जेथे रागदु:या काढल्या जात आहेत तेथे कशाला त्या वाटेला जायचे असे एका ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवले.
मात्र आमच्याकडे खूप जण येण्यास उत्सूक आहेत असे चित्र जाणीवपूर्वक तयार करायचे, दुसरीकडे शिवसेनेसह मित्रपक्षावर दबाव आणायचा आणि स्वत:च्या जागा वाढवून घ्यायच्या हे सूत्र या सगळ्या पतंगबाजीच्या मागे आहे. त्याचवेळी स्वत:च्या जागा कमी करण्याची वेळ शिवसेनेवर आलेली असताना नव्याने पक्ष प्रवेश करणा:यांना जागा कोणत्या द्यायच्या असा प्रश्नही शिवसेनेपुढे आहेच.
मागच्या वाटपानुसार 119 जागा लढवून मुख्यमंत्रीपद कसे मिळेल, असा प्रश्न पडल्याने आणि ‘मोदी टॉनिकं’मुळे राज्यातल्या भाजपाला आलेली तरतरी त्यांना गप्प बसू देत नाही. त्यातच महायुतीतील घटक पक्षाच्या याद्यांचे काय करायचे असा प्रश्न आहेच. या सगळ्यात शिवसेनेला मोठय़ा जागांवर पाणी सोडावे लागेल असे चित्र असताना भाजपाने मात्र किमान 144 जागा मिळाल्याच पाहिजेत असा आग्रह धरला आहे.