Join us

Mohit Kamboj Bhartiya gives warning: "महादेवा शप्पथ सांगतो, माझ्याविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्यांना..."; भाजपाच्या मोहित कंबोज यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 5:05 PM

मोहित कंबोज यांच्याविरोधात कर्ज बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Mohit Kamboj Bhartiya gives warning: भाजपा नेते मोहित कंबोज भारतीय (Mohit Kamboj Bhartiya) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केला. मोहित कंबोज यांच्यासह त्यांच्या कंपनीतील दोन संचालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहित कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसीज बँकेकडून ५२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या बँकेची त्यांनी फसवणूक केली असून त्यांच्यावर कर्ज न फेडल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्जाची रक्कम ज्यासाठी घेतली होती त्यासाठी वापरली नसल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला. या प्रकरणावरून मोहित कंबोज यांनी इशारा दिला.

"मला अपमानाचे भय वाटत नाही. तसेच मला इतरांनी सन्मान द्यावा असा आग्रहीदेखील मी कधीच कुणाकडे धरत नाही. पण ज्यांनी कोणी माझ्याविरोधात षडयंत्र रचलं आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की १ जून ही तारीख तुमची होती, ३० जून तारीख माझी असेल. मी १ जुलै येऊ देणार नाही. महादेवाची शपथ घेऊन सांगतो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांनी माझ्याविरोधात हे कारस्थान रचलं आहे, त्यांना मी ३० दिवसांच्या आतच उत्तर देईन", असे मोहित कंबोज म्हणाले.

मोहित कंबोज यांनी यासंदर्भात एक ट्विटही केलं होतं. "आज माझ्या विरुद्ध ईओडब्ल्यू मुंबईत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक बनावट एफआयआर नोंदवला आहे. माझ्या विरुद्ध एफआयआर केल्याने मी घाबरेन असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसे होणार नाही. मी सत्यासाठी न्यायालयात जाईन", असे ट्वीट करत त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले.

मोहित कंबोज याबद्दल आणखी बोलताना म्हणाले, "मला समजलं आहे की मुंबई पोलिसांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एक जुनी कंपनी २०१७ मध्ये बंद झाली आहे. त्याचे बॅंक इश्यू काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असे वाटते की, महाविकास आघाडी सरकार असं करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण असं असेल किंवा मला धमकावण्याचा प्रयत्न केला जात असेल तर मी तसं अजिबात होऊ देणार नाही. हा नवाब मलिकांचा किंवा संजय राऊतांचा बदला असेल. तर मी याविरोधात कोर्टात कायदेशीर लढा देईन."

टॅग्स :भाजपासंजय राऊतनवाब मलिक