मुंबई: समीर वानखेडे यांच्या नावावर असलेल्या नवी मुंबईतील बारचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्या बारचे लायसन्स रद्द केले आहेत. याचदरम्यान भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
मोहित कंबोज यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये विषय फक्त कोणाच्या बारचा परवाना रद्द करण्याचा नाही आहे, तर सत्तेत असताना सत्तेचा आणि अधिकार्यांच्या दुरूपयोग करण्याचा आहे. 24 वर्षानंतर समीर वानखेडेच्या बारचा परवाना रद्द केला गेला, यामध्ये खरच वानखेडेंचा परवाना चुकीचा होता का हे येणारी वेळ ठरवेल, असं कंबोज यांनी म्हटलं आहे. तसेच ज्यांनी हा परवाना रद्द केला, ते अधिकारी संजय राऊत यांचे व्याही ( संजय राऊत यांच्या मुलीचे सासरे ) आहेत, असं कंबोज यांनी सांगितलं.
मोहित कंबोज पुढे म्हणाले की, एकीकडे नवाब मलिकांना मुंबई हायकोर्टान कोर्टाचा अवमान करत असल्याप्रकरणा अनेकदा फटकारलं आहे. राज्यात सलीम - जावेदची ही जोडी आपापले पर्सनल स्कोर सेटल करण्यातच लागले आहेत. यामध्ये सलीम म्हणजे नवाब मलीक आणि जावेद म्हणजे संजय राऊत असल्याचं सांगत निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात आता स्वत:ची वैयक्तिक दुश्मनीमध्ये बदला घेण्यासाठी सत्ता आणि अधिकाऱ्यांचा वापर केला जातोय का?, असा सवालही कंबोज यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
बारचा मुद्देमाल ताब्यात घेणार-
बार परवाना घेण्याच्या वेळी वय कमी असल्याने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने समीर वानखडे यांच्या वाशी येथील सतगुरु बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. राज्य उत्पदान शुल्क यांच्या वतीने या बारचा मुद्देमाल ताब्यात घेणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे अधीक्षक निलेश सांगडे यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
समीर वानखेडे यांचे पिता ज्ञानदेव वानखेडे हे 1997 मध्ये उत्पादन शुल्क कार्यालयात नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी समीर वानखेडेंच्या नावावर बारचं परमीट काढलं होतं. त्याची नोंद ठाणे जिल्ह्याच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. समीर ज्ञानदेव वानखेडे या नावानं हे परमीट घेण्यात आलं. त्यावेळी समीर यांचं वय होतं 17 वर्ष 10 महिने आणि 19 दिवस. वडील उत्पादन शुल्क विभागात काम करत होता. त्यामुळे त्यांनी एका अल्पवयीन मुलाला बारचं परमीट दिलं. हा सर्वात मोठा फर्जीवाडा आहे” असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. वानखेडे यांच्या नावावर वाशी येथे हा बार आहे. या बारचं परमीट नूतनीकरणही करण्यात आलं आहे. 31 मार्च 2022 पर्यंत या बारचं परमीट नूतनीकरण करण्यात आलं आहे. हे बार आणि रेस्टॉरंट आहे, असं मलिक यांनी सांगितलं होतं.