मुंबई - शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरता निर्णय दिल्यानंतर सत्ताधारी भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचण्यास सुरुवात केली आहे. गर्व आणि अहंकार फक्त रावणालाच नाही तर धनुष्यबाणालाही मारतो अशा शब्दात भाजपा नेते मोहित कंबोज यांनीही ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मोहित कंबोज यांनी ट्विट करत म्हटलंय की, गर्व कुणालाही सोडत नाही. दुसऱ्यांचं घर तोडायला जे निघाले होते त्यांचं स्वःताचं घर कधी बर्बाद झालं ते त्यांनाही कळलं नाही. ईश्वराच्या लाठीत आवाज नसतो. कोण म्हणतं अहंकार फक्त रावणाला मारतो. अहंकार धनुष्यबाणालाही मारतो असं सांगत कंबोज यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये मर्सिडिसचा लोगो आणि पेग्विंग असलेला फोटो पोस्ट केला आहे. त्यावर चॉईस इज यूअर म्हणत खोचक टोला लगावला आहे.
रामदास आठवलेंची भन्नाट टीकाकेंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही शिवसेनेवर भन्नाट टीका केली आहे. त्यांनी ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "निवडणूक आयोगाने जेव्हा धनुष्यबाण गोठवले तेव्हा उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले! निवडणूक आयोगाने शिवसेना नाव गोठवले कारण उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या मागे लागून एकनाथ शिंदेंना आमच्याकडे पाठवले!" असं आठवले यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आयोगाची ऑर्डर नेमके काय सांगते?चिन्हाबाबत : धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविले असल्याने शिवसेनेच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिलेल्या निवडणूक चिन्हांच्या पर्यायापैकी त्यांना हवे ते वेगवेगळे चिन्ह मिळेल. त्यासाठी : शिवसेनेतील ठाकरे व शिंदे गटाने चिन्हांचेही तीन पर्याय पसंतीक्रमानुसार आयोगाला सोमवारी दुपारपर्यंत द्यायचे आहेत. त्याचा निर्णयही सोमवारी आयोग घेईल.
नावाबाबत : शिवसेनेतील दोन गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने एक दिलासा दिला आहे. दोन्ही गटांची जर इच्छा असेल तर शिवसेना हे नाव वापरून त्यापुढे स्वत:च्या गटाचे नाव जोडून ते वापरण्यास आयोगाने हरकत घेतलेली नाही. त्यासाठी : शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपल्याला कोणत्या नावाने ओळखले जावे याचे तीन पर्याय पसंतीक्रमानुसार निवडणूक आयोगासमोर सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत सादर करावे लागती, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यावर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे.