लवकरच ‘सलीम-जावेद’ जोडीवर गौप्यस्फोट करणार; भाजपा नेते मोहित कंबोज यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 03:09 PM2022-02-26T15:09:53+5:302022-02-26T15:10:45+5:30
तुमचे भ्रष्टाचार आता उघडकीस आले म्हणून तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना बदनाम करत आहात असा आरोप भाजपाने केला.
मुंबई – राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. या कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे सगळे नेते कार्यकर्ते निषेध आंदोलन करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांपासून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, इतर मंत्री आंदोलनाला बसले होते. त्याचसोबत राज्यातील विविध शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते भाजपा आणि ईडीविरोधात निदर्शने करत आहे. त्यातच भाजपा नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत, नवाब मलिकांना पुन्हा इशारा दिला आहे.
मोहित कंबोज म्हणाले की, संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांच्या प्रत्येक भाषणात, पत्रकार परिषदेत उत्तर भारतीयांचा विरोध करतात आणि दुसरीकडे उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना त्यांचे गुणगाण गात असतात हे दुतोंडी राजकारण त्यांनी बंद करावं. युवराजांना घेऊन ते उत्तर प्रदेश मध्ये गेले असताना तिथे उत्तर भारतीय लोकांची स्तुती केली. त्यामुळे हे दुतोंडी राजकारण करणाऱ्या संजय राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.
तसेच तुमचे भ्रष्टाचार आता उघडकीस आले म्हणून तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना बदनाम करत आहात. यासंदर्भात आम्ही कधी बोलत नाही पण आता तुमच्या सोबत जोडलेल्या अधिकाऱ्यांची पूर्णपणे माहिती आम्हांला आहे. लवकरच मी एका बड्या आयपीएस अधिकाऱ्याची संपूर्ण माहिती ही पुराव्यानिशी उघड करणार आहे. सलीम-जावेद या जोडीवर गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.
नवाब मलिक और संजय राउट केंद्रीय एजेंसियां और उनके अधिकारियों के नाम लेते है बदनाम करते है बिना सबूत के ,सलीम - जावेद को यह भूलना नहीं चाहिए हम किसी का नाम नहीं लेते लेकिन तुम्हारे इशारे पे काम करने वाले कुछ अधिकारियों के काले चिट्ठे सब हमारे पास हैं !
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 26, 2022
I Will Expose One IPS Soon!
मलिकांच्या अटकेनंतर जल्लोष केल्यानं कंबोज यांच्यावर गुन्हा
नवाब मलिक(Nawab Malik) यांना बुधवारी दुपारी ईडीनं अटक केली होती. जवळपास ८ तास चाललेल्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली. अटकेनंतर नवाब मलिकांना जेजे हॉस्पिटलला आणण्यात आले. त्यानंतर पीएमएलए कोर्टात मलिकांना हजर केले होते. सुनावणीवेळी ईडीनं नवाब मलिकांची १४ दिवसांची कोठडी मागितली. परंतु कोर्टाने ८ दिवस ईडी कोठडी सुनावली. ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. या अटकेनंतर मोहित कंबोज यांनी सांताक्रुझ परिसरात कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला होता. त्यात मोहित कंबोज इतके खुश झाल्याचं पाहायला मिळालं की मलिकांविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी थेट तलवार म्यानातून उपसली होती. त्यामुळे या घटनेची मुंबई पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. सांताक्रुझ पोलीस ठाण्यात मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.