"देशात कोरोनामुळे सर्वाधिक महाराष्ट्रात मृत्यू; हे पाप महाविकास आघाडी सरकारचं आहे"
By मुकेश चव्हाण | Updated: December 14, 2020 21:21 IST2020-12-14T21:19:35+5:302020-12-14T21:21:05+5:30
कोरोना काळात या सरकारने काय उपाय योजना केल्या आहेत, असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

"देशात कोरोनामुळे सर्वाधिक महाराष्ट्रात मृत्यू; हे पाप महाविकास आघाडी सरकारचं आहे"
मुंबई/ कुडाळ: राज्य सरकारने केवळ दोन दिवसांचंच हिवाळी अधिवेशन घेतल्याने त्यावरून भाजपाचे नेते नारायण राणे यांनी सरकावर निशाणा साधला आहे. राज्य सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न याबाबत कोणतीही चर्चाच करायची नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशन फक्त दोनच दिवस ठेवण्यात आल्याची टीका नारायणे राणे यांनी केली आहे.
नारायण राणे यांनी कुडाळ येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, राज्य आर्थिक संकटात आहे. राज्याची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे नेण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक 48,000 जणांचा कोरोनामुळ मृत्यू झाला आहे. हे पाप आताच्या महाविकास आघाडी सरकारचं आहे. कोरोना काळात या सरकारने काय उपाय योजना केल्या आहेत, असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या पदरी अपयश- नारायण राणे
नारायण राणे यांनी सांगितलं की, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या पदरी अपयश पडलं आहे. याला राज्य सरकारच जबाबादार आहे. सरकारला सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीनं बाजू मांडता आली नाही, असं नारायण राणे यांनी सांगितले. तसेच मराठा आंदोलनाला या सरकारने बळजबरीने दाबण्याचा, दडपण्याचा प्रयत्न केला तर त्याचे दुष्परिणाम राज्यात उमटतील आणि त्याला हे सरकार जबाबदार असेल असा इशाराही नारायण राणे यांनी यावेळी दिला आहे.
मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणात त्याचबरोबर नोकरीत आरक्षण मिळालं होतं. ते देखील सरकारला टीकवता आलं नाही. सरकारला मराठी आरक्षणावर बोलायच नाही, म्हणून हिवाळी अधिवेशन केवळ दोनच दिवसांचं घेण्याचा घाट घालण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य दिवाळखोरीत काढण्यात येत आहे. याला सरकारमधील मंत्री जबाबदार आहेत, असं नारायण राणे यांनी सांगितले.