Join us

उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीतील हे सर्वोत्तम काम; स्मृतीस्थळाच्या शुद्धीकरणावरून नारायण राणेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 8:54 PM

Narayan Rane On Uddhav Thackeray : शिवसैनिकांनी राणेंच्या भेटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं.

ठळक मुद्देशिवसैनिकांनी राणेंच्या भेटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरूवारी मुंबईत जनआशीर्वाद यात्रा केली. यात राणेंनी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट दिली आणि ते नतमस्तक झाले. त्यानंतर राणेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळासाहेब आज असते तर त्यांनी मला नक्कीच आशीर्वाद दिले असते, असं वक्तव्य केलं. दुसरीकडे शिवसैनिकांनी राणेंच्या भेटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं आहे. यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी हे शुद्धीकरण करणं उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काम असल्याचं म्हणत संताप व्यक्त केला. 

"उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीतील हे शुद्धीकरण करणं हे सर्वोत्तम काम आहे. ते दुसरं काहीही करू शकत नाहीत," अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. नारायण राणे यांनी घेतलेल्या दर्शनानंतर संध्याकाळी काही शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शुद्धीकरण केलं, यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 

स्मृतीस्थळाचं शुद्धीकरणबाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी स्मृतीस्थळावर आधी दुग्धाभिषेक आणि त्यानंतर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं आहे. गुरूवारी सकाळी नारायण राणे यांनी स्मृती स्थळाचं दर्शन घेतल्यामुळे हे शुद्धीकरण करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे इतर कार्यकर्ते देखील उपस्थित होते. 

शेलारांकडूनही टीका"अशुद्ध आणि शुद्ध असा भेदभाव करणारी मनस्थिती प्रबोधनकार ठाकरेंना मानणाऱ्या पक्षाची आहे. ही विदारक स्थिती आहे. ती जागा काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नाही. ती मुंबई महानगरपालिकेची आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जागी कुणी जायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शुद्धीकरण करायचं असेल तर शिवसेनेचं करावं लागेल, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

"ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलं. त्या छगन भुजबळांसोबत सत्ता स्थापनेसाठी बसायचं. स्वत:च्या वडिलांच्या विचारांना आणि प्रेरणेला बगल देऊन केलं आहे. या शिवसेनेचं शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे. शुद्धीकरणाच्या नावाने नौटंकी करू नये," असा घणाघात देखील आशिष शेलार यांनी केला.

टॅग्स :नारायण राणे भाजपाशिवसेनाउद्धव ठाकरेबाळासाहेब ठाकरेआशीष शेलारछगन भुजबळ