लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 01:24 PM2024-05-28T13:24:56+5:302024-05-28T13:29:43+5:30

भाजपा नेते निलेश राणे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.

BJP leader Nilesh Rane criticized Minister Chhagan Bhujbal | लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले

लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले

राज्यात लोकसभा निवडणुका संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभेतील जागावाटप आणि आता पुढे विधानसभेतील जागावाटपावर भाष्य केले."लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सर्वात कमी जागा मिळाल्या. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत. या लोकसभा निवडणुकीत जी खटपट झाली, ती खटपट विधानसभेच्या निवडणुकीत होता कामा", असं विधान केले. तसेच '४०० पार'च्या घोषणेमुळे महायुतीचे नुकसान झाले', असं वक्तव्यही भुजबळ यांनी केले. यावरुन आता भाजपातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, भाजपा नेते निलेश राणे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. 

“लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही”; अजित पवारांचे विधान चर्चेत

"आपण ज्येष्ठ आहात, अनुभवी आहात आपण मार्गदर्शन करण्याच्या भूमीकेत असलं पाहिजे. आपण युतीमध्ये मंत्री आहात. नेहमी आम्हीच का ऐकून घ्याव. आघाडीमध्ये मला काय वाटतं ते महत्वाचं नसतं, आघाडीला काय वाटतं ते महत्वाचं असतं. आघाडी कशी टीकेल हे बघितले पाहिजे, असंही निलेश राणे म्हणाले. 

भाजपा नेते निलेश राणे यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्स'वर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये छगन भुजबळ यांच्यावर राणे यांनी टीका केली आहे.

निलेश राणे यांची पोस्ट काय?

"श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे, मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं?, असा सवाल त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे. 

"मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही. आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही, असा टोलाही निलेश राणे यांनी भुजबळ यांना लगावला आहे. 

"आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही, आणि होणार नाही. कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असूनसुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे, असंही या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले होते?

काल मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची बैठक झाली. या बैठकीत आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा झाली. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, ४०० पार, ४०० पारचा आकडा दलित समाजाच्या मनावर एवढा बिंबवला गेला. ४०० पार म्हणजे संविधान बदलणार, असं वाटू लागलं. त्यामुळे त्यांच्या मनातील ते काढता काढता नाकीनऊ आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सांगत होते की, असं होणार नाही. तरीही लोकसभा निवडणुकीत काही परिणाम पाहायला मिळाला. आता एक संपलं नाही तोच दुसरं समोर आलं. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती येणार. हे अशा प्रकारे मध्येच कोणीतरी काहीही काढतं आणि त्यावर चर्चा सुरू होते. हे थांबवलं गेलं पाहिजे, असंही भुजबळ म्हणाले. यावरुन आता प्रतिक्रीया येत आहेत.  

Web Title: BJP leader Nilesh Rane criticized Minister Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.