मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर सोमवारी पार पडला. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदार मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे बंधू आणि विक्रोळी मतदारसंघाचे आमदार सुनिल राऊत मंत्रिमंडळात डावलल्याने आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र सुनिल राऊत यांनी नाराजीचे वृत्त खोडून काढले. तसेच आता शिवसेनेचे नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे देखील मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज असून शिवसेनेच्या नेते पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी रामदास कदम यांना ट्विटरच्या माध्यमातून टोला लगावला आहे.
निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खूष करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले. तुम्ही आम्हाला शिव्या घालून तुम्ही शिवसेनेशी किती निष्ठावान आहात हे दाखवायचा, पण आज तुम्हाला उलट शिवी घालणार नाही कारण न घालता ती तुम्हाला बसलेली असल्याचे म्हणत निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.
रामदास कदम शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांना मंत्रिपदाचा अनुभव देखील आहे. मात्र रामदास कदम यांना विश्वासात न घेता नव्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके मंत्रिमंडळात डावलल्याने आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे.