"उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य नाही"
By मुकेश चव्हाण | Published: December 23, 2020 03:14 PM2020-12-23T15:14:20+5:302020-12-23T15:14:32+5:30
भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई: आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील असे भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वर्तवले आहे. आमचा एकही आमदार फुटणार नाही असा विश्वास विरोधी पक्षाला असला तरी राज्यात तीन पक्ष एकत्र आल्याने येत्या काळात एकाच पक्षातून पक्षांतर होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांच्या या विधानानंतर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. एक शहर सांभाळू शकत नाही. कुबड्यांवर सरकार चालत आहे. तसेच उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर, फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करेल आणि देशाचं वाटोळं करेल, असा घणाघाती टीका निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
तत्पूर्वी, भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्याच्या भूकंपाचे केंद्रबिंदू शिवसेना भवन असेल असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. तसेच कोणत्याही गोष्टीवर टीका करण्यात भाजपाचे काही लोक आघाडीवर असून त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी तीन पक्ष एकत्र आल्याने आगामी काळात एकाच पक्षातून इनकमिंग होणार असल्याचा दावा केला. विरोधी पक्षामध्ये मूळचे कमी आणि बाहेरचे लोक जास्त आहेत. त्यामुळेच या बाहेरच्या लोकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांची ही अस्वस्थता पाहता उद्या जर आम्ही काहीही न करता राजकीय भूकंप झाला तर त्याचे नवल वाटणार नाही, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेला पाठिंबा- संजय राऊत
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरूनही त्यांनी भाजपला लक्ष्य केले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार हतबल झाले. ५० वर्षांत इतके हतबल सरकार कधीही दिसले नाही. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. मात्र, हे आंदोलन राजकारणविरहित असल्यामुळे शिवसेना या आंदोलनात सहभागी होत नसल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
नाशिक महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे-
नाशिकच्या महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. नाशिक कायम सेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मागच्या पाच वर्षांत काय झालं ते सोडा, आता काय होणार आहे ते पाहा. बाळासाहेब सानप भाजपमध्ये गेल्याने काय होणार? ते आमच्यात होते तरी कुठला फायदा झाला, असा चिमटा देखील संजय राऊत यांनी यावेळी काढला.