Join us  

"मुख्यमंत्र्याचं प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असतं, पण हे सात तास गाडी चालवताहेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 5:01 PM

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबई: आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सपत्नीक पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी ते स्वत: गाडी चालवत पंढरपूर गेले. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते. मुंबई ते पंढरपूर असा प्रवास करुन मुख्यमंत्री मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास पंढरपूरात दाखल झाले होते. 

मुंबई ते पंढरपूर या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच गाडी चालवली. स्वतः गाडी चालवत पंढरपूरला महापूजेसाठी जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर ते मुंबई स्वतः गाडी चालवली. बरोबर आहे, सरकार अधिकारी चालवतायत, मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. पण इकडे ७ तास मुख्यमंत्री गाडी चालवतो म्हणजे कोरोना या विषयावर सरकार किती गंभीर आहे दिसून येते, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. तसेच उद्या ते गाडी पण धुतील तर आम्ही काय करु, असा टोला देखील निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 

राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगची सक्ती सुरू आहे. प्रवासातही ठराविक प्रवाशांच मूभा देण्यात आली आहे. कोरोनाच्या सुरूवातीपासून  उद्धव ठाकरे हे स्वतःच गाडी चालवत मंत्रालय आणि इतर भेटींच्या ठिकाणी जाताना दिसून आलं. मंत्रालयात होणाऱ्या बैठकांनाही उद्धव ठाकरे स्वतःच गाडी चालवत हजर राहतात. मे मध्ये आमदारकीची शपथ घेतली. त्यावेळी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आले होते. त्यावेळीही ते स्वतः गाडी चालवत असल्याचं बघायला मिळालं होतं.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या हस्ते बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पांडुरंगाची शासकीय महापूजा पार पाडली. या महापुजेनंतर त्यांनी वारकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, मंदिरात भाषण करायचं नसतं, आपण सगळेजण माऊलींचे भक्त म्हणून जमलो आहोत, ना कोणी मुख्यमंत्री ना अधिकारी माऊलींसमोर आपण सगळे सारखेच आहेत. हा मान मला मिळेल असा स्वप्नातही विचार केला नव्हता, मान मिळाला पण अशा परिस्थितीत पूजा करावी लागेल हेदेखील कधी विचार केला नव्हता असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगतिले.

टॅग्स :उद्धव ठाकरेनिलेश राणे महाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विकास आघाडीशिवसेनामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसआषाढी एकादशी