'संधी सगळ्यांना मिळते'; भाजपा नेत्याचा अविनाश जाधव यांना 'मन'से पाठिंबा, तर राज्य सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 08:52 AM2020-08-04T08:52:38+5:302020-08-04T08:52:44+5:30
भाजपाचे नेते निलेश राणे यांनी देखील अविनाश जाधव यांच्या अटकेवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबई: मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून २ वर्ष हद्दपार होण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अविनाश जाधव विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या मुलींना काढल्याप्रकरणी मनसेकडून ३१ जुलैला ठाणे महापालिकेसमोर आंदोलन सुरु होतं. हे आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. अविनाश जाधव यांना अटक झाल्यानंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. याच दरम्यान आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी देखील अविनाश जाधव यांच्या अटकेवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.
निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, मनसेचा नेता अविनाश जाधव यांना आंदोलन करताना अटक करण्यात आली व दोन वर्षाची तडीपारी लावली. मात्र दूसऱ्या बाजूला खासदार विनायक राऊत यांचा मुलगा पोलिसांना धमकी देतो, तरीही त्याचावर साधी तक्रार नाही. त्यामुळे राज्य सरकारने विसरु नये संधी सगळ्यांना मिळते, असं म्हणत निलेश राणे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
मनसे नेता अविनाश जाधवला आंदोलन करताना अटक करण्यात आली व दोन वर्षाची तडीपारी लावली, दुसऱ्या बाजूला शिवसेना खासदार विनायक राऊत चा मुलगा दारू पिऊन पोलिसांना धमकी देतो तरी त्याच्यावर साधी तक्रार नाही. एक गोष्ट राज्य सरकारने विसरू नये... संधी सगळ्यांना मिळते.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 3, 2020
तत्पूर्वी, न्यायालयाने अविनाश जाधव यांना ३ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे आज न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र ठाण्यातील अधीनस्थ न्यायालयाने अविनाश जाधव यांचा जामीन फेटाळला. अविनाश जाधव यांच्यावर ३५३ चं कलम लावण्यात आलं आहे. त्यामुळे ३५३ प्रकरणातील गुन्ह्यांची सुनावणी सत्र न्यायालयात होते. त्यामुळे याबाबत सत्र न्यायालयात युक्तिवाद करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे अविनाश जाधव यांना 6 ऑगस्टपर्यत न्यायालयिन कोठडी मिळाली असून त्यांची तळोजा तुरुंवासात रवानगी करण्यात आली आहे. अधीनस्थ न्यायालयाच्या या आदेशानूसार आम्ही आता सत्र न्यायालयात अविनाश जाधव यांना जामीन मिळण्याबाबत अर्ज दाखल केला असून 6 ऑगस्टला याबाबत सुनावणी होणार असल्याचे नितीन सरदेसाई यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना अविनाश जाधव यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर अविनाश जाधव म्हणाले की, याबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, मागची अनेक वर्ष लोकांसाठी आंदोलन करतोय, स्वत:साठी आंदोलन केले नाही, आजही विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या मुलांसाठी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना त्यांना ही नोटीस प्राप्त झाली आहे. या नोटिशीमध्ये मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यातून हद्दपार होण्यासं सांगितलं आहे.
जिल्ह्यात इतके गुंड आहेत त्यांना अशी नोटीस कधी बजावली नाही, लोकांसाठी आंदोलन करताना अशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे असा आरोप त्यांनी केला.तसेच माझ्या सुरुवातीच्या सभेत मी म्हटलं होतं मला पोलीस तडीपारीची नोटीस बजावतील, आज ती नोटीस मला मिळाली. लोकांसाठी भांडायचं नाही का? लोकांसाठी आंदोलन करताना तडीपारीची नोटीस हे महाराष्ट्र सरकारचं बक्षीस आहे, कोकणासाठी मोफत बस सोडणार म्हणून हे बक्षीस आहे, लोकांचे, पोलिसांच्या समस्या प्रखरतेने मांडले त्याचं हे बक्षीस आहे. त्यामुळे यापुढे लोकांसाठी कोणी रस्त्यावर उतरायचं की नाही हे लोकांनी ठरवावं. नोटीस आली म्हणून थांबणार नाही तर लोकांना न्याय देण्याचं काम करणारच असंही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.