मुंबई: देशासह राज्यभरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वेगानं वाढत आहे. राज्यात रविवारी ११३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७४८वर पोहचली आहे. तसचे कोरोनामुळे राज्यभरात एकूण ४६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर देशातील मृतांचा आकडा ८९ वर पोहचला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे. यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी सरकारला टोला लगावला आहे.
देशाच्या तुलनेत ५० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे. परंतु तरीही आपण म्हणायचं महाराष्ट्र सरकार चांगल काम करतय असं ट्विट करत निलेश राणे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी राज्यातील जनतेशी सातत्याने संवाद साधत आहेत. तसेच उद्धव ठाकरेंच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईचे सोशल मीडियावरही कौतुक करण्यात येत आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी उद्धव ठाकरेंच जाहीर कौतुक केले होते. ‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोना संकट हाताळत आहे, ते कौतुकास्पद आहे. माझा सॅल्युट,’असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले होते.
दरम्यान, राज्यात एकूण ४५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूपैकी ८ जण मुंबईतील, ३ जण पुण्याचे तर प्रत्येकी १ रुग्ण कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद येथील आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६००८ नमुन्यांपैकी १४८३७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ७४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५६ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ४६,५८६ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३१२२ जणांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3500 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील ८९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.