मुंबई: क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यापासून NCB च्या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. क्रुझवर उपस्थित असणाऱ्या बड्या ड्रग्ज माफियाला समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी सोडून दिलं असा दावा मलिकांनी केला आहे. मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे, वानखेडे कुटुंबीयही मैदानात उतरले असून पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांना इशारा दिला आहे.
क्रांती रेडकर यांच्या या वक्तव्यावरुन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं. कारण जर मागचा इतिहास काढला तर महागात पडेल आणि लक्षात येईल की हमाम में सब नंगे है, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. तसेच पत्नी म्हणून ती तिचे कर्तव्य पार पाडत असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ज्या क्रुझवर अमली पदार्थाची पार्टी झाली त्यात ४ हजार जणांचा समावेश होता. मात्र त्याली फक्त सहा जणांनाच अटक कशी होते, उर्वरीत ३९९४ जण कुठे आहेत, त्यांना का सोडण्यात आले असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या या टीकेनंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एका महिलेशी बोलताना भाषा कशी वापरली पाहिजे पवार साहेबांनी शिकवलं नाही का? पवार साहेब हे आपले संस्कार?, असा खोचक सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, मलिकांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे यांचं कुटुंब चांगलेच भडकले आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी जात प्रमाणपत्रावरुनही स्पष्टीकरण दिलंय. जात प्रमाणपत्रानुसार समीर वानखेडे हिंदू आहेत ते नाकारलं जाऊ शकत नाही. नवाब मलिक यांनी कोर्टात जावं. मंत्री नवाब मलिक खूप खालच्या पातळीवर गेलेत आहेत. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. आरोप करताना लाज वाटली पाहिजे. हिंदू महार असल्याचं प्रमाणपत्र सासऱ्यांनी सगळ्यांना दाखवलं आहे. नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते कोर्टात सिद्ध करावे. जितक्या खालच्या दर्जाला जात आहे, त्याने असंच वाटतं मंत्रिपदाचं त्यांना काही देणंघेणं नाही, असेही क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिक हे घाणेरडं राजकारण करत आहेत, ते आमच्या वैयक्तिक बाबी, फोटो, कागदपत्रे सोशल मीडियावरुन जाहीर करत आहेत. आता, आमच्या संयमाचा बांध फुटत आहे, त्यामुळे आता आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू, असा इशाराच क्रांती रेडकर यांनी दिलाय. तसेच, नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या बर्थ सर्टीफिकेटवरुन चॅलेंज दिले होते. जर, मी शेअर केलेला जन्मदाखला खोटा असेल, तर मी राजकारण सोडून देईन असे मलिक यांनी म्हटले होते. त्यावरही, क्रांती रेडकर यांनी उत्तर दिलंय, आता त्यांना ते सोडावं लागेल, असं क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिकांचा पुन्हा आरोप-
समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांशी संबंध आहेत. मुंबईत ज्या क्रूझवरील ड्रग्स पार्टीवर (Mumbai Cruise Drugs Party) कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियाही होता. तसेच त्याची गर्लफ्रेंडही बंदुकीसह क्रूझवर होती. तो कुठल्या देशाचा नागरिक आहे. त्याच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत, याचा तपास झाला पाहिजे. या क्रूझवर कारवाई करण्यात आली तेव्हा काही मोजक्याच लोकांना पकडण्यात आले. मात्र हजारो लोकांना झाडाझडती न घेता का सोडून देण्यात आहे. सॅम डिसोझा आणि दाढीवाला कोण, असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.