"उद्धव ठाकरे सांगतिल, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती; मग जिंकायची गरज काय?"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 02:51 PM2022-06-14T14:51:50+5:302022-06-14T14:52:09+5:30

भाजपाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

BJP leader Nilesh Rane has criticized NCP chief Sharad Pawar and Chief Minister Uddhav Thackeray. | "उद्धव ठाकरे सांगतिल, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती; मग जिंकायची गरज काय?"

"उद्धव ठाकरे सांगतिल, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती; मग जिंकायची गरज काय?"

googlenewsNext

मुंबई- देशात राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीतील (UPA) बऱ्याच पक्षांनी शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील काही घटक पक्षांनीदेखील पवार राष्ट्रपती झाल्यास तो महाराष्ट्राचा सन्मान असेल, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे, युपीएकडून शरद पवार यांचे नाव चर्चेत असताना आता खुद्द शरद पवारांनीच याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. 

शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असल्यास आमचा पाठिंबा असेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. तर, शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदच होईल, ही महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब असेल असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच, देशातील राजकीय वर्तुळातही पवार यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र, मी या स्पर्धेत नसल्याचं खुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवारांच्या या विधानावरुन भाजपाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, पवार साहेब, राष्ट्रपती निवडणुक पराभवाच्या भीतीने माघार घेण्याचा निर्णय तुमचा योग्य आहे, कारण तुमच्याकडे मुख्यमंत्री आहेत. ते म्हणतील तुम्हाला, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती, मग जिंकायची गरज काय?, आजपासून तुम्ही राष्ट्रपती..., असं म्हणत निलेश राणे यांनी शरद पवारांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

दरम्यान, शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. यासंदर्भात शरद पवार यांना विचारले असता, आपण या स्पर्धेत नाही असं स्पष्ट केलं असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही,” असं शरद पवारांनी यावेळी उपस्थित कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं. त्यामुळे, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 

शरद पवारांनी राष्ट्रपती होऊ नये - आव्हाड

राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र वेगळंच गणित मांडलं. शरद पवार यांना राष्ट्रपती करू नये, असं म्हणत त्यांनी त्यामागचं कारणही सांगितलं. शरद पवार यांच्यासारखे व्यक्तिमत्व स्वत:ला राष्ट्रपती भवनाच्या कोंडवाड्यात कोंडून घेऊ शकत नाहीत. जे राजकारणी मुख्यप्रवाहात असतात, त्यांनी मुख्यप्रवाहातच राहावं. ज्या पद्धतीने शरद पवार आजही ग्रामीण भागात फिरतात, लोकांशी संवाद साधतात ते पाहता त्यांनी याचपद्धतीचे काम कायम करावे असं मला वाटतं. ते राष्ट्रपती झाले तर त्यामुळे महाराष्ट्राचा सन्मान होईल हे खरं आहे. पण शरद पवार जोपर्यंत लोकांच्यात मिसळत नाहीत तोवर त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि आनंद दिसत नाही. त्यामुळे त्यांनी लोकांमध्येच राहावे, तोच त्यांचा खरा हक्क आहे", असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Web Title: BJP leader Nilesh Rane has criticized NCP chief Sharad Pawar and Chief Minister Uddhav Thackeray.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.