"वय वाढतंय तसा पवारांचा हिंदू धर्मावरचा रागही वाढतोय"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 10:07 AM2020-07-29T10:07:17+5:302020-07-29T10:08:32+5:30
शरद पवारांच्या विधानावरुन आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.
मुंबई: अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आमंत्रितांची यादीही तयार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिपूजन सोहळ्याचं आमंत्रण मिळालं तरी मी अयोध्येला जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. मात्र शरद पवारांच्या या विधानावरुन आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.
निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, एवढं मात्र खरं आहे, शरद पवारांचं वय बघून कोण काय बोलत नाही पण जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर त्यांचा राग पण वाढताना दिसत आहे.
राम मंदिराबाबत कोणताही वाद नाही. सुप्रीम कोर्टाने हा वाद मिटवलेला आहे, असं शरद पवारांनी सांगितले. तसेच राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही. कारण सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी आहे असं सांगत त्यांनी या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, अयोध्येतील प्रभू राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत भिन्न मते आहेत. राम मंदिराच्या भूमीपूजनाबाबत शरद पवारांनी विधान केले होते. कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं असं शरद पवार म्हणाले होते, या विधानावरुन अनेक वादंग झाला होता.
राम मंदिराचे ई-भूमिपूजन करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमीपूजन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.