Join us

'जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार'; राणेंचा पवारांना टोला

By मुकेश चव्हाण | Published: September 30, 2020 10:51 AM

शरद पवारांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

मुंबई: छत्रपती संभाजी राजे व छत्रपती उदयनराजे भोसले यांची नियुक्ती भाजपाने केली आहे. त्यामुळे ते त्यांचीच भाषा बोलत आहेत. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. शरद पवारांच्या या विधानावरुन आता भाजपाने निशाणा साधला आहे.

भाजपाचे नेते निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, शरद पवार यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे आर्श्चर्य वाटतं. पण जे स्वत:च्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. तसेच या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलं की शरद पवारांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यावर, ज्यांच्या पक्षाचा एकही आमदार व खासदार नाही. त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहातही कोणी गांभीर्याने घेत नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. माजी आमदार दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी शरद पवार मंगळवारी पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले होते.

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीबाबत शरद पवार म्हणाले की, संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व भाजपाच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे या भेटीला राजकीय अर्थ नाही. काही झाले तरी हे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

कृषी विधेयक येण्यापूर्वीही शेतकऱ्यांना त्यांचा माल इतर ठिकाणी विक्री करता येत होता. कृषी विधेयकाला सर्व स्तरातून विरोध होत आहे. सर्व मिळून या विधेयकाला विरोध करणार आहोत. याचे नेतृत्व कोणी एकटा न करता शेतकरी करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

सीबीआयने काय दिवे लावले?

अभिनेता सुशांतसिंहची आत्महत्या राहिली बाजूला आणि इतरच गोष्टी समोर येत आहेत. चौकशी करणाºया यंत्रणा लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवू पाहात आहेत का?, अशी शंका घेण्यासारखी अवस्था आहे. आम्ही वाचलं होतं की, एका कलाकाराने आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते मात्र केंद्रसरकारचा त्यांच्यावर विश्वास दिसत नाही म्हणून त्यांनी हा तपास वेगळ्या एजन्सीकडे दिला. या एजन्सीने काय दिवे लावले त्याचा प्रकाश काही आम्हाला बघायला मिळालेला नाही, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :शरद पवारनिलेश राणे भाजपाराष्ट्रवादी काँग्रेसमराठा आरक्षण