Join us

'आता राष्ट्रवादीवर गुन्हा दाखल करण्याची शिवसैनिक हिंमत दाखवणार का?'; निलेश राणेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 1:59 PM

ट्विटरवर गुरुवारी #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता.

मुंबई: ठाकरे सरकारची ‘मुघलराज’शी तुलना करणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरचा रहिवासी असलेल्या समीत ठक्कर याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करत सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. 

शिवसेनेचे कायदेशीर सल्लागार धरम मिश्रा यांनी समीर ठक्करविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र या सर्व घडामोडीनंतर ट्विटरवर गुरुवारी #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता. मात्र आता समीत ठक्कर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विटरवर राष्ट्रवादीच्या एका ट्विटचा फोटो शेअर करुन सवाल उपस्थित केला आहे.

निलेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील एका ट्विटचा फोटो शेअर केला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ७ जून २०१९ला दुष्काळी दौरा केल्यानंतर राष्ट्रवादीने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं कार्टून काढण्यात आलं होतं. याच ट्विटचा उल्लेख करत निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे राष्ट्रवादीनं केलेल्या त्या ट्विटचा फोटो शेअर करत शिवसैनिक आता राष्ट्रवादीवर गुन्हा दाखल करणार का, असा सवाल उपस्थित केला आहे. 

दरम्यान, समीत ठक्कर याने उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हा नव्या काळातील औरंगजेब असा केला असून आदित्य ठाकरे यांना मोहम्मद आझम शाह उर्फ बेबी पेंग्विन असंही म्हटलं आहे. त्यामुळे ट्विटरला सध्या #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. समीत ठक्कर याच्यावर तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता. आतापर्यंत #BabyPenguin हा हॅशटॅग वापरून हजारो ट्वीट झाले आहेत.

टॅग्स :निलेश राणे आदित्य ठाकरेशिवसेनाभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकार