Join us

'नाणार रिफायनरीच्या विरोधात आंदोलन केली, माता-भगिनींनी केसेस अंगावर घेतल्या पण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 2:13 PM

राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेने कोकणात राबविल्या जाणाऱ्या नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता.

मुंबई: राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेने कोकणात राबविल्या जाणाऱ्या नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कोकणात नाणारच्या विरोधात प्रचार करून नाणार प्रकल्प बासनात गुंडाळण्याचं वचन देऊन मतंही मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता सत्तेत येताच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या पहिल्या पानावर नाणारची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने नाणार रिफायनरी विरोधात सातत्यानं आक्रमक होणाऱ्या शिवसेनेनं त्यांची भूमिका बदलली की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सामनाच्या कोकण आवृत्तीच्या पहिल्याच पानावर रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (आरआरपीसीएल) जाहिरात छापून आली आहे. नाणारमुळे स्थानिकांना रोजगार आणि उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा मजकूर जाहिरातीत आहे. 'रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच', असा जाहिरातमध्ये  उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. 

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पैशासाठी हे लोकं विकले जातात हे आम्ही वारंवार सांगतो. नाणार रिफायनरीला तीव्र विरोध केला, तरुण व माता-भगिनीनी आंदोलन करत केसेस अंगावर घेतल्या पण नेहमीप्रमाणे यु टर्न घेत ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलं त्यांच्याशीच परत गद्दारी केली. जगात एवढं नीच राजकारण कोणी करू शकत नाही अशी टीका निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.

नाणार जाणार नाही, तर इथे होऊ घातलेला प्रकल्प जाणार. कोणत्याही परिस्थितीत हा विनाशकारी प्रकल्प कोकणात होऊ दिला जाणार नाही, अशी घोषणा गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उद्धव ठाकरे यांनी केली होती. विशेष म्हणजे नाणारमधल्याच सभेत त्यांनी ही घोषणा केली होती. कोकणच्या भूमीत आमची हाडामासाची, रक्ताची नाती जोडलेली आहेत. त्यांना विकत घेता येणार नाही. हा प्रकल्प इतकाच चांगला असेल तर तो गुजरातला घेऊन जा. इथे प्रकल्प लादायचा प्रयत्न करू नका. हा प्रकल्प नाणारमध्ये नाहीच, पण महाराष्ट्रातही होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे आता शिवसेनेच्या मुखपत्रात आलेल्या या जाहिरातीवर भाजपसह शिवसेनेचे आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेते हे येणाऱ्या काळातच समोर येणार आहे.

टॅग्स :नाणार प्रकल्पनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पउद्धव ठाकरेशिवसेनामहाराष्ट्र