मुंबई: भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच ध्वजारोहण सोहळा होता. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांच्या ध्वजारोहणाच्या फोटोवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे.
निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवास्थानी पार पडलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचा फोटो शेअर केला आहे. तसेच फोटो शेअर करुन झेंडा मागे आहे मग मुख्यमंत्री सॅल्युट कोणाला मारतायं असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे समोर CBI दिसली की काय, असं म्हणत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला देखील लगावला आहे.
दरम्यान, खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल तसंच सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांच हित जोपासलं जाईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण झाल्यानंतर उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल झाले होते. त्यावेळ त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी विशेष आमंत्रित काही कोविड योद्धे, डॉक्टर, नर्सेस उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि उच्च स्तरीय अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी राज्य मंत्री दीपक केसरकर ही उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटात पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. पोलिसांच्या कामगिरीचा सार्थ अभिमान असल्याचं देखील म्हटलं आहे. तसेच खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल आणि सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांचं हित जोपासलं जाईल असं म्हणत 'जय जवान जय किसान, जय कामगार'चा नारा दिला. यासोबतच कामगारांचे हित जोपासण्यास प्राधान्य दिलं जाणार असल्याचं देखील म्हटलं आहे. डॉक्टर्स, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत अशा भावना यावेळी उद्धव ठाकरे व्यक्त केल्या आहेत.