"स्वतः बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात; त्यामुळे एक नोकरी मुख्यमंत्र्यांनीही घ्यावी"
By मुकेश चव्हाण | Published: November 3, 2020 01:38 PM2020-11-03T13:38:37+5:302020-11-03T13:39:00+5:30
भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
मुंबई: राज्यात तब्बल ३४ हजार ८५० कोटींच्या गुंतवणुकीसह २३ हजार १८४ जणांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या उद्योगांची उभारणी महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच यासाठी सामंजस्य करारांवर सोमवारी स्वाक्षरी करण्यात आल्या असून उद्धव ठाकरे यांनी राज्यात एक लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र यावरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, स्वतःसाठी एक नोकरी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, कारण स्वतः बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात. स्वतः काहीतरी करतील तरच नोकरी व व्यवसायाची किंमत कळेल, असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
स्वतःसाठी एक नोकरी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी कारण स्वतः बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात. स्वतः काहीतरी करतील तरच नोकरी व व्यवसायाची किंमत कळेल. https://t.co/1G0vsMNEBy
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 2, 2020
तत्पूर्वी, लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात सरकारने १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार केले होते. त्यातील ६० टक्के उद्योगांच्या जमीन अधिग्रहणासारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या कार्यक्रमाला उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य गुंतवणुकीचे लक्ष्य सहज साध्य करेल असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.
शरद पवारांना मुख्यमंत्र्यांची वारंवार पाठराखण करावी लागत आहे- भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील
शरद पवार हे विरोधी पक्षाचे असले तरी त्यांच्या विषयी मला नितांत आदर आहे. अनेक गोष्टींना त्यांनी न्याय दिला आला आहे. अशा नेत्याला मुख्यमंत्र्यांची वारंवार भलामण करावी लागते याचं वाईट वाटत आहे. महाविकास आघाडी सरकार चालवण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना मुख्यमंत्र्यांची वारंवार पाठराखण करावी लागत आहे. त्यांना वेळोवेळी प्रोटेक्ट करावे लागते. परंतु, पवार ते मनापासून करत असतील असे मला वाटत नाही. बाबा, मी या वयात इतका फिरतोय, तू ही किमान बाहेर पड असेच मुख्यमंत्र्यांप्रती शरद पवारांना वाटत असणार आहे, अशा शब्दात भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
राज्यात कोरोना व्हायरससारखं महाभयंकर संकट असताना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचं निवास्थान असलेल्या मातोश्रीबाहेर पडत नाही. काही अपवाध वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.