मुंबई: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजपा नेत्यांनी न्यायालायच्या निर्णयाचं स्वागत करत राज्य सरकारवर चौफेर टीका सुरू केली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यानंतर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा मागितला पाहिजे. आंधळा आणि बहिरा पण सांगेल की मुंबई पोलिसांवर मागच्या ६५ दिवसांत कोण दबाव टाकत होतं. तसेच एवढा दबाव फक्त मुख्यमंत्री कार्यालय टाकू शकतं, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे राजीनामा पण मुख्यमंत्र्यांनीच दिला पाहिजे, असं निलेश राणे यांनी सांगितले.
भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनीही केवळ काही शब्दांचं ट्वीट केलं आहे. 'अब बेबी पेंग्विन तो गियो... इट्स शो टाइम' असं त्यांनी म्हटलं आहे. #JusticeForSSR असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. त्यांचा रोख नेमका कुणावर आहे याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. सुप्रीम कोर्टाने आज (19 ऑगस्ट) हा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. बिहारच्या पाटण्यात आपल्याविरोधात दाखल झालेला गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा, अशी मागणी करत सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीनेही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.