Join us

रिफायनरीसाठी बारसू गावाचा प्रस्ताव ठेवण्यामागे काहीतरी गौडबंगाल; ७/१२ पाहावा लागेल- राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 9:26 AM

भाजपाचे नेते नितेश राणे यांनी नाणार रिफायनरी वरन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

मुंबई- रत्नागिरीतील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्यांमुळे रखडला होता. मात्र हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच बारसू गाव परिसरात उभारण्याबाबत राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याचेही सांगण्यात येत आहे. 

रिफायनरी प्रकल्पासाठी १४ हजार एकर जागा देण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच बंदरासाठी जवळपास २४१४ एकर जागा देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव आणि पश्चिम भागातील काही गावांचा आणि भागांचा या उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये उल्लेख केल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. 

राज्य सरकारच्या या भूमिकेवरुन भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी टोला लगावला आहे. रिफायनरी प्रकल्प आता झाला पाहिजे याबाबत शिवसेनेच्या भूमिकेत का बदल झाला? असा नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.  बारसूला रिफायनरी नेण्यामागे काही तरी कारणं असतील. राजापूरच्या परिसरातील जागेचे मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले होते, त्याचे लागेबंधे शिवसेनेकडे जात होते. त्याअर्थी रिफायनरीसाठी बारसू गावाचा प्रस्ताव ठेवला आहे त्यामागे काहीतरी गौडबंगाल आहे, असा आरोपही नितेश राणे यांनी केला आहे, 

बारसूला रिफायनरी नेण्यामागे काही तरी कारणं असतील. राजापूरच्या परिसरातील जागेचे मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले होते, त्याचे लागेबंधे शिवसेनेकडे जात होते. त्याअर्थी रिफायनरीसाठी बारसू गावाचा प्रस्ताव ठेवला आहे त्यामागे काहीतरी गौडबंगाल आहे. शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये उगाच 'मातोश्री' लिहिलेलं नाही. या बारसूतल्या ७/१२ मध्ये मातोश्री आहे का ते तपासतो, असा टोला राणेंनी लगावला.

दरम्यान, नाणार प्रकल्पाच्या विरोधातील स्थानिकांच्या आंदोलनाला साथ देत शिवसेनेने नाणार प्रकल्प जाणार अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे नाणार येथील रिफायनरी प्रकल्प शिवसेनेच्या विरोधामुळे बारगळला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी एका मराठी वृत्तपत्रानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारचं मनपरिवर्तन झाल्यानं या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता नाणारचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

टॅग्स :नाणार प्रकल्परत्नागिरीनीतेश राणे उद्धव ठाकरेशिवसेना