"उद्धव ठाकरेंचं भाषण वाया गेलेल्या मुलाच्या चिडलेल्या बापाच्या भाषणासारखं होतं"
By मुकेश चव्हाण | Published: October 26, 2020 01:39 PM2020-10-26T13:39:19+5:302020-10-26T13:54:39+5:30
भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राणे कुटुंबीयांवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणेंना बेडुकाची उपमा दिल्यानं राणे बंधुंनी देखील शिवसेनेवर पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे वाया गेलेल्या मुलाच्या थकलेल्या आणि चिडलेल्या बापाचं भाषण होतं, अशी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तसेच मंत्री आदित्य ठाकरेंचं नाव आम्ही घेतलं नव्हतं, ते स्वत:च स्पष्टीकरण देत आहेत, मुलगा-वडील स्वत:च सांगत आहेत, आदित्य ठाकरे श्रावण बाळ आहे, असं टोला देखील नितेश राणे यांनी टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ठाकरे पिता- पुत्रावर लगावला आहे. त्याचप्रमाणे भाजपाचे नेते नारायण राणे आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या टीकेला राणे कुटुंब काय प्रत्युत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
तत्पूर्वी, भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून नारायण राणे आणि नितेश राणे सातत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात तितक्याच सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले होते. राज्यात काही जणांना इंजेक्शन देणे गरजेचे असते ते आम्ही देतो. बेडके किती ही फुगले तरीही ते वाघ होत नाहीत, तुम्हाला माहिती आहे. एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झालाय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.
निलेश राणेंनी दिलं आव्हान
'नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल एक वाक्य, पण बिहारवर २० मिनिटे. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा...,' असं आव्हानच नीलेश राणे यांनी दिलं आहे.
नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य पण बिहारवर २० मिनिट. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा... तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 25, 2020