Join us

'...तो वाघ नसतो, त्याला पालतू कुत्रा म्हणतात'; नितेश राणेंनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 1:40 PM

विजय वडेट्टीवार यांच्या विधानानंतर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुंबई: वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो, असं म्हणत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात पार पडलेल्या ओबीसी चिंतन बैठकीतून शिवसेनेला टोला लगावला होता. विजय वडेट्टीवार यांच्या या विधानानंतर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, मंत्री महोदय म्हणतात, आमच्या इशाऱ्यावर वाघ चालतो. इशाऱ्यावर चालणारा वाघ एकतर सर्कसमध्ये असतो. नाहीतर तो वाघच नसतो. त्याला पालतू कुत्रा म्हणतात, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच बाकी समझदारोंको इशारा काफी है, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे. 

तत्पूर्वी, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोणावळा येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची परिषद दोन दिवसांसाठी भरवण्यात आली होती. या परिषदेची रविवारी सांगता झाली. त्यादरम्यान सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील ओबीसी नेते या परिषदेला उपस्थित होते. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचं नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावल्याचं पाहायला मिळालं.

विजय वडेट्टीवार यांनी मी अशा भागातील राहतो जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही, असं म्हटलं. यावर मंचावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा असं सांगितल्या. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.

टॅग्स :नीतेश राणे भाजपाशिवसेना