मुंबई: ईडीने बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर आता शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अनिल परब चौकशीसाठी हजेरी लावली आहे. माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी ही माहिती दिली. आपण कोणताही गैरव्यवहार केला नसल्यानं आज ईडीच्या चौकशीला सामोरं जात असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.
अनिल परब म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या मुलींची शपथ घेऊन सांगत आहे की, कोणत्याही गैरव्यवहारात आपला हात नाही. आपल्याला ईडीने का बोलावलं आहे याची माहिती नाही. या चौकशीदरम्यान जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तर आपण देणार आहोत. तसेच ईडीने अनिल परब यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. नेमक्या कोणत्या कारणासाठी आपल्याला चौकशीला बोलावलं आहे हे आपल्याला माहिती नसून ईडीला या प्रकरणी आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.
अनिल परब यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी टोला लगावला आहे. स्व. शिवसेनाप्रमुखांपेक्षा आताच्या पक्षप्रमुखांची शप्पत घेतली असती, तर परबांवर आणखी विश्वास आला असता, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी ईडीने हा समन्स बजावला आहे. सचिन वाझे गृहविभागातील बदल्यांच्या संदर्भात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला होता. तसेच सचिन वाझे याने दिलेल्या आपल्या कथित स्टेटमेंटमध्ये अनिल परब यांच्यावर आरोप करत म्हटलं होतं की, बदल्या थांबवण्यासाठी अनिल परब यांना 20 कोटी रुपये मिळाले होते.