मुंबई- ठाकरे आणि शिंदे वादामध्ये निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं, तसंच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यावरही बंदी घालण्यात आली. यानंतर आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळी नावं दिली आहेत, तर ठाकरे गटाला निवडणुकीसाठी नवीन चिन्हही दिलं आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे. तसंच ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह मिळालं आहे.
ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ती मशाल नव्हे तर आईसक्रीमचा कोन, आहे, असं नितेश राणे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंचं मशाल हे चिन्ह होऊच शकत नाही. त्या माणसामधील आग संपली आहे, असा निशाणाही नितेश राणे यांनी यावेळी लगावला. नितेश राणेंच्या या विधानावर ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला ‘दोन तलवार व ढाल’ असे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. तसेच या पक्षाला राज्यातील प्रादेशिक पक्ष म्हणूनही निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. ‘दोन तलवार व ढाल’ चिन्ह यापूर्वी ‘पीपल्स डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’ या पक्षाचे होते; परंतु या पक्षाला २००४ मध्ये नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून आलेल्या या प्रस्तावाला निवडणूक आयोग मान्यता देत असल्याचे आदेशात म्हटले आहे. या चिन्हाचा वापर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक वा आयोगाचा अंतिम निर्णय येईपर्यंत वैध राहील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
पेटलेली मशाल आम्ही विझवण्याचे काम करणार- केंद्रीय मंत्री रामदास आठवले
ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंधेरीच्या पोटनिवडणूकीत उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल आम्ही विझवण्याचे काम करणार, असं रामदास आठवले म्हणाले. रामदास आठवले यांनी यावेळी भाजपाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. भाजपाचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा रामदास आठवले यांनी यावेळी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"