मुंबई: राष्ट्रवा्दी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत ११ जुलैपासून वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीचा टीझर देखील आज ट्विट केला आहे. यामध्ये संजय राऊत यांनी एक शरद, सगळे गारद असं म्हटले आहे. मात्र संजय राऊतांच्या या शब्दांवरुन भाजपाचे नेते नितेश राणे यांनी टोला लगावला आहे.
नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, राऊत म्हणतात एक शरद सगळे गारद, मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण गारद का, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच आपल्याच मालकाला, वाह क्या बात असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवर या मुलाखती संदर्भातील व्हिडीओचा टीझर टाकला आहे. 'एक शरद, सगळे गारद!! महाराष्ट्रातील सत्ता बदल हा अपघात होता काय?' असा मथळा असलेला हा व्हिडिओ उत्कंठा वाढवणारा ठरला आहे. शरद पवारांची मुलाखत ऐतिहासिक ठरेल. अशी मुलाखत होणे नाही, असा दावा राऊत यांनी केला. 'शरद पवार यांची मुलाखत घेण्याचं आधीच ठरलं होतं. शरद पवार हे राज्यातील देशातील प्रमुख नेते आहेत. लोकांनी बघितलेले आणि मी पाहिलेले पवार वेगळे आहेत. त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले, बदनामीकारक विधानं केली गेली. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हा लोकांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण मी म्हटलं होतं की, शरद पवार सरकार स्थापन करतील. त्यांनी बसलेली खीळ तोडून सरकार स्थापन केलं,' असं राऊत यांनी म्हटलं होतं.
अन्य महत्वाच्या बातम्या-
'आमच्या प्रज्ञास्थळावर, महाराष्ट्रधर्मावर हल्ला'; राजगृहावरील हल्ल्याचा मनसेकडून निषेध
राजगृहावरील तोडफोड प्रकरणी गोपीचंद पडळकरांनी केलं ट्विट; म्हणाले...